कट्टर विरोधक एकत्र, अजित पवारांचं राजकारण बदलतंय, बारामतीत नेमक्या काय घडामोडी?

कट्टर विरोधक एकत्र, अजित पवारांचं राजकारण बदलतंय, बारामतीत नेमक्या काय घडामोडी?

 

बारामती : लोकसभेच्या दारूण पराभवातून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बराच धडा घेत आपल्या राजकारणाची दिशाच बदलली आहे. त्याचे दृश्य परिणाम इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दिसून आले. तब्बल २२ वर्षे एकमेकांचे तोंडही न पाहणारे आणि जहाल टीका करणारे पृथ्वीराज जाचक आणि अजित पवार अचानक एकत्र आले आणि तो प्रयोग यशस्वी करून दाखवला. त्यापूर्वीच मागील चार वर्षांपूर्वी अजित पवारांनी त्यांचे परंपरागत आणि कट्टर विरोधक असलेल्या काकडे कुटुंबियांना बरोबर घेण्याचा प्रयोग यशस्वी करून दाखला होताच.

दरम्यान, छत्रपती कारखान्यानंतर माळेगाव कारखान्यातही विरोधातील प्रचंड वातावरण पाहून अजित पवारांनी चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे या परंपरागत विरोधकांशी हातमिळवणी करण्याचे हरतऱ्हेने प्रयत्न केले. मात्र जनरेट्यापुढे आणि तावरेंच्या महत्वाकांक्षी वृत्तीपुढे ते सारेच फोल ठरले. त्या निवडणुकीत अजित पवारांनी एकहाती बाजी मारली. तरी प्रत्यक्षात राष्ट्रवादीच्या संचालकांना निवडून आणण्यासाठी जी हाराकिरी झाली, ती सर्वांनीच पाहिली, एकीकडे अजित पवारांनी पुढे केलेला मैत्राची हात झिडकारल्याने तेल गेले, तूप गेले आणि हाती धुपाटणे आले, अशी अवस्था रंजन तावरे आणि चंद्रराव तावरे यांच्या गटाची झाली. तर दुसरीकडे विजय मिळवूनही त्याचे म्हणावे एवढे समाधान अजित पवारांनाही झाले नाही.

आता स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूकीच्या निमित्ताने राजकारणाचा दुसरा अंक बारामतीत सुरू झाला आहे. निमित्त आहे ते, माळेगावच्या नगरपंचायत निवडणूकीचे आणि बारामतीच्या नगरपरिषद निवडणूकीचे. बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील विरोधकच संपवायचा विडा अजित पवारांनी जणू उचलला आणि मागील निवडणूकीवेळी अजित पवारांच्या नाकावर टिच्चून विजयी होत अजित पवारांच्या एकहाती वर्चस्वाला सुरुंग लावणारे स्थानिक नेते यावेळी अजित पवारांच्या गोटात सामील झाले आहेत.

आता माळेगाव नगरपंचायतीतही तसेच झाले आहे. कट्टर विरोधक असलेल्या रंजन तावरे यांनी सबुरीचे धोरण स्वीकारत अजित पवारांबरोबर युती केली आहे. वास्तविक पाहता माळेगाव ग्रामपंचायतीवर रंजन तावरे आणि विरोधकांचे एरव्ही वर्चस्व राहीले. मात्र आता माळेगाव कारखान्याच्या निवडणूकीच्या निमित्ताने पराभवाचा धडा शिकलेल्या रंजन तावरे यांनी राजकीय चातुर्य दाखवत आणि भाजपश्रेष्ठींचे चार उपदेशाचे बोल मनावर घेत अजित पवारांशी युती केली आहे. मात्र यानिमित्ताने अजित पवारांच्या बदलत्या राजनितीचाही प्रत्यय येऊ लागला आहे.

एरव्ही गेल्या 30 ते ३५ वर्षात जो विरोधक आहे, त्याला निवडणुकीत नेस्तनाबूत करणारे आणि कोणाचंही न ऐकणारे अजित पवार पाहायची सवय झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाही अजित पवारांची नवी राजनीती अचंबित करणारी ठरली आहे. अर्थात आपले घर शाबूत राहीले, तर आपण राज्याच्या राजकारणात गप्पा मारू शकतो याची पुरती जाणीव असलेल्या अजित पवारांनी शरद पवारांपासून बाजूला निघाल्यानंतरही आपणच या तालुक्याचे दादा आहोत हे पुरते जाणवून देण्याचा प्रयत्न या वेगवेगळ्या राजकीय खेळ्यांच्या माध्यमातून केला आहे.

विरोधकांनाच बरोबर घेऊन राजकारण करण्याची नवी पद्धत यानिमित्ताने बारामतीत आणि एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षात रुजू पाहत आहे. एका अर्थाने ती योग्य आणि सकारात्मक आहेच, शिवाय अजित पवारांना राजकीय क्षेत्रात बरीच मजल मारण्यासाठीही ती हितकर आहे. फक्त अजित पवारांचा तो मूळ स्वभाव नाही, मात्र बदलत्या राजकीय वातावरणानुसार अजित पवारांनी स्वतःच्याही राजकारणाला बदलले हाच याचा सार आहे.