भाजपाचा नेता ठाकरे गटात; शिंदेंचे ३५ आमदार फुटणार? फडणवीसांच्या नार्को टेस्टची मागणी; वाचा ५ घडामोडी…

भाजपाचा नेता ठाकरे गटात; शिंदेंचे ३५ आमदार फुटणार? फडणवीसांच्या नार्को टेस्टची मागणी; वाचा ५ घडामोडी…

 

मुंबई: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असताना शिवसेना ठाकरे गटाने भाजपाला मोठा धक्का दिला… ‘एकनाथ शिंदेंनी पेरले तेच उगवले ऑपरेशन लोटसमध्ये शिंदे गटाचे ३५ आमदार फुटणार’, असा दावा शिवसेनेच्या सामना मुखपत्रातून करण्यात आला… भीमशक्ती आणि शिवशक्तीची युती सत्तेसाठी नव्हे तर न्यायासाठी असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले… रत्नागिरीत शिंदेसेनेचा नगराध्यक्ष निवडून जरी आला तरी पुन्हा पोट निवडणूक लागणार, असा दावा भाजपाच्या जिल्हाध्यक्षांनी केला… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे सर्वात मोठे ‘आका’ असून त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

भाजपाचा नेता ठाकरे गटात

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असताना भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला. डोंबिवलीतील भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष योगेंद्र भोईर व त्यांच्या पत्नी ट्विंकल भोईर यांनी आज शिवसेना ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतील मातोश्री या निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. योगेंद्र भोईर हे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात. आगामी काळात कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्याआधीच भोईर दाम्पत्याने ठाकरे गटात प्रवेश केल्याने भाजपाला हा मोठा धक्का मानला जात आहे. या पक्षप्रवेश कार्यक्रमाच्या वेळी ठाकरे नेते विनायक राऊत, उपनेते संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत, जिल्हाप्रमुख तात्यासाहेब माने, डोंबिवली शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

शिंदेंचे ३५ आमदार फुटणार?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना राज्यातील सत्ताधारी महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. खासदार श्रीकांत शिंदे बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कल्याण-डोंबिवलीत भाजपाने शिवसेना शिंदे गटाला एकापाठोपाठ एक धक्के देण्यास सुरुवात केली आहे. शहरातील शिंदे गटाचे पदाधिकारी भाजपात प्रवेश करीत आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भूमिकेमुळे शिंदे गटातील नेत्यांनी नाराजी व्यक्त करीत आहे. त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने महायुतीतील नाराजीच्या चर्चेला अधिकच बळकटी मिळाली आहे. यादरम्यान दिल्लीतील भेटीवेळी अमित शाह शिंदेंना यांना जुमानले नाही, अशी टीका ठाकरे गटाचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी त्यांच्या ऑपरेशन लोटस या मोहिमेअंतर्गत शिंदे ३५ आमदार फोडणार असल्याचा दावाही अग्रलेखात करण्यात आला आहे. शिंदेंनी जे पेरलंय तेच उगवतंय, असा टोलाही यावेळी लगावण्यात आला आहे.

भीमशक्ती-शिवशक्तीची युती न्यायासाठी – शिंदे

भीमशक्ती आणि शिवशक्तीची युती सत्तेसाठी नव्हे तर फक्त न्यायासाठी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ठाण्यातील मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात शुक्रवारी रिपब्लिकन सेनेच्या ११ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर उपस्थित होते. शिवशक्ती आणि भीमशक्ती पुन्हा एकत्र आल्या हा योगायोग नसून इतिहास घडत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जगातले सर्वोत्तम संविधान दिले. त्या घटनेमुळे सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला सुद्धा सर्वोच्च स्थान मिळू शकते, असे शिंदे म्हणाले. ठाण्यात २५ वर्षांपूर्वी आनंद दिघे यांनी भीमशक्ती आणि शिवशक्तीची मुहूर्तमेढ रोवली होती. आता आमची झालेली युती ही सत्ता मिळवण्यासाठी नव्हे, तर सर्वसामान्यांच्या न्यायासाठी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपाच्या जिल्हाध्यक्षांची शिंदे गटावर टीका

रत्नागिरीत शिंदेसेनेचा नगराध्यक्ष निवडून जरी आला तरी पुढील दोन ते अडीच वर्षात नगरपालिकेची पोटनिवडणूक लागणार हे निश्चित आहे, असा दावा भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी केला. रत्नागिरीतील निवडणुका राजकीय स्वार्थासाठी घेतल्या जात आहेत. जनतेच्या पैशाची ही उधळपट्टी का करावी. नगरपालिका निवडणुका राजकीय स्वार्थासाठी नव्हे तर या नागरिकांचे वीज, रस्ते, पाणी आदी मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी घेतल्या जातात, असा संतापही त्यांनी व्यक्त केला. राजेश सावंत यांची कन्या शिवानी सावंत-माने या ठाकरेंच्या शिवसेनेकडून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. त्यामुळे आजपासून आपल्या मुलीच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुलीच्या राजकीय कारकिर्दीसाठी भाजपाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देणा-या राजेश सावंत याचा राजीनामा रत्नागिरीत चर्चेचा विषय ठरला आहे.

काँग्रेसकडून फडणवीसांच्या नार्को टेस्टची मागणी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाती-जातीत कलह निर्माण केले आहेत. राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी, धनगर विरुद्ध आदिवासी, हिंदू विरुद्ध मुस्लीम अशी भांडणे लावून द्वेष पसरवला जात आहे. फडणवीस हेच महाराष्ट्राचे सर्वात मोठे ‘आका’ असून त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. पालिका निवडणुकांच्या निमित्ताने सपकाळ यांची आज शनिवारी (दि.२२) परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे जाहीर सभा झाली. यावेळी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. गरिबांचे मरण हेच भाजपचे धोरण आहे. भाजपच्या मंत्र्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केलेला असून बंद पडलेले घड्याळ आणि उधार आणलेला धनुष्यबाण याच्या आधारे भाजपने महाराष्ट्रात सत्तेचा दुरुपयोग सुरू केला आहे असे यावेळी सपकाळ म्हणाले. त्यांनी आपल्या भाषणात सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.