सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यांने पहिला हप्ता रु. ३३०० देण्याचे केले जाहीर
बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यांने चालू गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये गाळपास येणाऱ्या ऊसासाठी प्रथम हप्ता रु.३३०० रूपये प्रतिटन प्रमाणे देण्याचे जाहिर केले आहे. आता माळेगाव, छत्रपतीसह इतर सहकारी साखर कारखान्यांचा पहिला हप्ता कधी जाहीर होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सोमेश्वर कारखान्याचा गळीत हंगाम १ नोव्हेंबर पासून चालू असून सध्या १० हजार टन प्रतिदिन क्षमतेने गाळप होत आहे. आज अखेर एकूण २ लाख ४ हजार २५५ टन गाळप झाले असून जिल्ह्यामध्ये उच्चांकी साखर उतारा राखून १ लाख ९८ हजार १०० क्विंटल इतके साखरेचे उत्पादन झालेले आहे. तसेच डिस्टीलरीमधून ९ लाख २० हजार लिटर्स अल्कोहोलचे उत्पादन घेतलेले आहे तर सहविजनिर्मिती प्रकल्पामधून १ कोटी १५ लाख ५४ हजार ९२० युनिट्सची महावितरण कंपनीस विक्री केलेली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची विकासाची घौडदौड चालू असून गाळप हंगाम २०२५-२६ यशस्विरित्या पार पडेल अशा प्रकारचे नियोजन कारखाना व्यवस्थापनाने केलेले आहे. या हंगामामध्ये साधारणपणे १४ लाख टन गाळपाचे उद्धिष्ट ठेवलेले असून ऊस पुरवठा सातत्याने होण्याच्या दृष्टीकोनातून पुरेशी ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा भरलेली आहे.
शासनाच्या नियमानुसार या गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ.आर.पी.) ३ हजार २८५ रूपये प्रतिटन इतका निघत असून संचालक मंडळाने प्रथम हप्त्यापोटी रु.३ हजार ३०० प्रतिटन देण्याचे निश्चित केलेले आहे. १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीमध्ये गळीतास आलेल्या ऊसाची प्रथम हप्त्याप्रमाणे होणारी रक्कम ऊस उत्पादक सभासदांच्या बँक खात्यामध्ये २ दिवसांमध्ये वर्ग करीत असल्याचे कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले.
सोमेश्वर कारखाना नेहमीच उच्चांकी दर देत असून या हंगामातही उच्चांकी ऊस दराची परंपरा सोमेश्वर राखणार असल्याचा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला. कारखान्याच्या गाळप क्षमतेस अनुसरुन पुरेसा ऊस उपलब्ध होणेच्या दृष्टीने आवश्यक तोडणी व वाहतूक यंत्रणा भरलेली असून ऊस तोडणीचे पुर्णपणे नियोजन केलेले असल्याचेही जगताप यांनी सांगितले. त्यामुळे कार्यक्षत्रातील शेतकऱ्यांनी सर्व ऊस सोमेश्वर कारखान्यास गळीतासाठी द्यावा तसेच गळीत हंगाम यशस्विरित्या पार पाडणेसाठी सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा, कंत्राटदार यांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.