एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यात दुरावा? समोरासमोर आले, पण संवाद नाही
शनिवार, २२ नोव्हेंबर, २०२५
Edit
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या
चर्चा सातत्याने समोर येत आहेत. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांनी
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
घेतली होती. या भेटीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे
नाराजी व्यक्त केली. यानंतर एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर गेले. त्यांनी
दिल्लीत जावून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत
एकनाथ शिंदे यांनी आपली नाराजी मांडल्याची चर्चा आहे. पण तरीही एकनाथ शिंदे
यांची नाराजी दूर झाली नसल्याची चर्चा आहे. या चर्चांना उधाण येण्यामागचं
कारण म्हणजे आजच्या कार्यक्रमात शिंदे आणि फडणवीस यांची देहबोली.
मुंबईत
एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ
शिंदे हे समोरासमोर आले. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी एकमेकांना
नमस्कार केला. पण दोघांमध्ये कोणताही संवाद झाला नाही. एरव्ही एकमेकांच्या
बाजूला असताना हसत-खेळत राहणारे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोन्ही
नेत्यांची देहबोली आज थोडीशी अवघडल्यासारखी बघायला मिळाली. त्यामुळे
दोन्ही नेत्यांच्या देहबोलीची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. तसेच
एकनाथ शिंदे यांची नाराजी किती दिवस राहते? त्यांची नाराजी दूर करण्यात
भाजपला यश येतं का? ते पाहणं महत्त्वाचंदेखील आता महत्त्वाचं आहे.
फडणवीस-अजित पवारांचा एकत्र प्रवास
विशेष म्हणजे बिहारच्या
नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तीनही नेते
उपस्थित होते. यावेळी देखील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात
फारसा संवाद झालेला बघायला मिळाला नाही. विशेष म्हणजे या शपथविधीसाठी
जाताना देवेंद्र फडणवीस आणि
अजित पवार यांनी एकत्र प्रवास केला तर एकनाथ शिंदे यांनी एकट्याने प्रवास
केल्याची माहिती आहे. तसेच शपथविधी सोहळा आटोपल्यानंतर एकनाथ शिंदे हे
एकटेच परत आल्याचं समोर आलं आहे. पण अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे सोबत
आल्याची माहिती आहे. 'एबीपी माझा'ने याबाबत वृत्त दिलं आहे.
याशिवाय 18 नोव्हेंबर 2025 ला राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती. या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे मंत्रालयातून बाहेर पडले तेव्हा त्यांची देहबोली ही नाराज असल्याची भासत असल्याचं काहींचं म्हणणं होतं. त्या दिवसापासूनची त्यांची नाराजी अद्यापही तशीच असल्याची चर्चा आहे.