मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर
राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढण्याची
भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे
प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र येताना दिसत आहेत.
आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती होताना दिसण्याची शक्यता
आहे. पण राज ठाकरे यांना सोबत घेणं हे काँग्रेसच्या मुंबईतील काही
नेत्यांना मान्य नाहीय. त्यामुळे काँग्रेसने याआधीच स्वतंत्र निवडणुकीची
घोषणा केली होती. पण दोन दिवसांपूर्वी वेगळ्या घडामोडी घडल्या. त्यामुळे
आता आगामी काळात महाविकास आघाडीत डॅमेज कंट्रोल होण्याची शक्यता असल्याची
चर्चा आहे.
काँग्रेसच्या मुंबईतील नेत्यांच्या शिष्टमंडळाने दोन
दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी
जावून भेट घेतली. यावेळी काँग्रेस नेत्यांनी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी
शरद पवारांना युतीचा प्रस्ताव दिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
आणि काँग्रेस पक्षाची अनेक वर्षांपासूनची नैसर्गिक युती राहिलेली आहे.
त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुका एकत्र लढण्यासाठी आघाडीचा आपण प्रस्ताव
दिल्याचं काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं. तर शरद
पवारांनी दोन दिवसांत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांशी याबाबत चर्चा करु,
असं काँग्रेसच्या शिष्टमंडळाला सांगितलं होतं. या सगळ्या घडामोडींनंतर आता
सूत्रांकडून शरद पवार यांची भूमिका समोर येत आहे.
शरद पवार ठाकरे बंधूंबाबत सकारात्मक
राज ठाकरे आणि उद्धव
ठाकरे या दोन्ही भावांनी राजकीयदृष्ट्या एकत्र येण्यावर शरद पवार यांची
सकारात्मक भूमिका असल्याची माहिती आहे. मुंबई महापालिका निवडणूक ही
महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढलं पाहिजे, अशी पवारांची भूमिका आहे. मतदार
यादीमधील घोळा संदर्भात एकत्रित येत सत्याचा मोर्चा काढता, मग निवडणूक का
वेगळी लढता? असा सवाल शरद पवारांनी केल्याचं सूत्रांची माहिती आहे. तसेच
महाविकास आघाडीत मनसेला सामील करुन घेण्यासही शरद पवार सकारात्मक असल्याची
माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सर्वांना सोबत घेऊन लढलं तर सर्वांना फायदा होईल.
फाटाफूट झाली तर दोघांचं नुकसान होईल. विरोधकांची एकजूट फार महत्त्वाची
आहे, अशी उद्धव ठाकरेंची भूमिका
आहे. तसचे उद्धव ठाकरे हे सध्या काँग्रेसच्या हायकमांडच्या संपर्कात
असल्याची देखील माहिती समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणात आता काय-काय
घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं आहे.