शरद पवारांनी जाहीरपणे व्यक्त केली नाराजी, म्हणाले...

शरद पवारांनी जाहीरपणे व्यक्त केली नाराजी, म्हणाले...

 

बारामती : महायुतीतील तीनही पक्ष राज्य सरकारच्या वेगवेगळ्या निधीवरून स्वतःकडे श्रेय घेण्याची चढाओढ करत असल्याचे दिसून येत आहे. यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज बारामतीत प्रतिक्रिया दिली. शरद पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. बारामतीतील गोविंदबाग या ठिकाणी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. एका बाजूला अर्थ खात आमच्याकडे आहे. आम्ही निधी देऊ शकतो. तर राज्याचे मालक देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. तर दुसऱ्या बाजूला नगरविकास खाते आमच्याकडे आहे, असे महायुतीतील नेते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान बोलताना दिसून येतात. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

"ही जी काही चढाओढ चालू आहे की, पैसे किती द्यायचे, मत मागतोय, कामाच्या जोरावर नव्हे तर... पैसे घे निधी घे.. असं एकंदरीत दिसतंय.. आणि ही गोष्ट चांगली नाही. अर्थकारण आणून निवडणुका जिंकायच्या हा दृष्टिकोन असेल तर त्यावर न बोललेलं बरं", अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यावरून सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. याबाबत पत्रकारांनी शरद पवारांना प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. "याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा अप्रोच फार स्ट्राँग दिसतोय. त्यामुळे त्यांचा अंतिम निर्णय पुढील दोन दिवसात काय येईल हे सांगता येत नाही", असे शरद पवार म्हणाले.

'माझ्यासारखे लोक अशा निवडणुकांमध्ये पडत नाही'

"खरं सांगायचं झालं..! तर या स्थानिक निवडणुका असतात. यापूर्वी देशातील अनेक नेत्यांनी स्थानिक निवडणुकांमध्ये फारसं राजकारण आणू नये अशी भूमिका घेतलेली होती. त्यामुळे या निवडणुकीत मला पहिल्यांदा असं दिसून येत आहे की, ठिकठिकाणी गट झाले आहेत. तोच एक गट दुसऱ्या पक्षाबरोबर निवडणुका लढवत आहे. याचा अर्थ असा निघतो की, परस्परांमध्ये एक वाक्यता नाही. मात्र लोक हवा तो निकाल देतील..! तसेच माझ्यासारखे जे लोक आहेत ते अशा निवडणुकांमध्ये पडत नव्हतो आणि आत्ताही नाही", अशी रोखठोक प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.