शिक्षक व पदवीधर मतदार संघांच्या निवडणुकांसाठी मतदार नोंदणी सुरु
मुंबई : पुणे, नागपूर व औरंगाबाद विभागातील पदवीधर मतदार संघ, तसेच पुणे व अमरावती विभागातील शिक्षक मतदार संघांच्या द्विवार्षिक निवडणुकांसाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, ६ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पात्र पदवीधर आणि शिक्षकांकडून अनुक्रमे प्रपत्र १८ व १९ मध्ये प्राप्त झालेल्या अर्जांवर संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी पात्रता-अपात्रतेचा निर्णय घेतील. त्यानुसार २५ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येतील.
नागरिकांना २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२५ या कालावधीत या यादीविषयी दावे व हरकती सादर करण्याची संधी मिळेल. तसेच, ६ नोव्हेंबरनंतरही पदवीधर आणि शिक्षकांना प्रपत्र १८ व १९ द्वारे मतदार नोंदणी करण्याची मुभा असेल. १० डिसेंबर २०२५ पर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांवर विचार करून ३० डिसेंबर २०२५ रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
शिक्षक आणि पदवीधर मतदार संघांसाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा देखील उपलब्ध आहे. अद्याप अर्ज सादर न केलेल्या पात्र पदवीधर व शिक्षकांनी तात्काळ आपली नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.