बारामतीत नगरपरिषद निवडणूकीचे वातावरण तापू लागले!

बारामतीत नगरपरिषद निवडणूकीचे वातावरण तापू लागले!

 

नगरपरिषद निवडणूकीसाठी सोमवारपासून (ता. 10) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे. या निवडणूकीसाठी सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांकडून आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी लगबग व तयारी सुरु झाली आहे.

बारामती : बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद यंदा खुले असल्याने सर्वाधिक चुरस व रस्सीखेच त्या पदासाठी होणार आहे. बारामती नगरपरिषदेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेच आजपर्यंत वर्चस्व आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदासाठी कोण उमेदवार दिला जाणार या बाबत कमालीची उत्सुकता आहे. दरम्यान राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदासाठी किरण गुजर,  जय पाटील, सुभाष सोमाणी, शाम इंगळे, अभिजित काळे, प्रदीप शिंदे, करण वाघोलीकर, जयसिंग (बबलू) काटे देशमुख, शिवाजीराव कदम, अनिल कदम, विशाल जाधव, विक्रांत तांबे, सचिन सातव यांनी तसेच नगरसेवक पदासाठी 288 इच्छुकांनी अर्ज नेले असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली.

दरम्यान बहुजन समाज पक्षाचे महासचिव काळूराम चौधरी हेही नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. बहुजन समाज पक्ष प्रा. लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी संघर्ष समितीसोबत युती करुन निवडणूकीला सामोरा जाणार असल्याची माहिती काळूराम चौधरी यांनी दिली. वंचित बहुजन आघाडीकडूनही निवडणूकीसाठी बैठकांचे सत्र सुरु असून राज कुमार व मंगलदास निकाळजे यांनी देखील ही निवडणूक ताकदीने लढविण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून नगराध्यक्षपदाचा उमेदवार दिला जाणार असल्याचे विजय कोलते यांनी स्पष्ट केले आहे. नगरसेवक पदासाठीही अनेकांनी मोर्चेबांधणी केलेली असून आपली वर्णी लागावी या साठी गाठीभेटी सुरु केल्या आहेत.