बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी गणेश जोजारे यांना उमेदवारी मिळण्यासाठी विविध समाजातील संघटनांकडून अजितदादांकडे मागणी
बारामती: बारामती नगरपरिषद निवडणुकीच्या रणधूमाळीला सुरुवात झाली असून आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार हे इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत. अशातच आता बारामतीतील सराफ व्यावसायिक आणि सर्वधर्मसमभाव या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले गणेश जोजारे यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा होत आहे. विशेष म्हणजे, जोजारे यांना उमेदवारी मिळावी यासाठी सर्व समाजातील संघटनांकडून अजितदादांकडे आग्रह करण्यात आला आहे.
बारामतीतील सराफ व्यावसायिक असलेले गणेश जोजारे हे गेल्या काही वर्षांपासून ‘सर्वधर्मसमभाव’ या संस्थेच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहेत. धार्मिक सौहार्द, रक्तदान शिबिरे, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत, तसेच शहरातील गरजू कुटुंबांना आधार देणारे अनेक उपक्रम त्यांनी स्वतःच्या पुढाकाराने केले आहेत. विशेष म्हणजे, बारामतीत झालेल्या मराठा क्रांती मोर्चातही त्यांनी सहभाग घेत छोटीशी जबाबदारी पार पाडली होती. त्यामुळे सामाजिकदृष्ट्या संवेदनशील आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारे व्यक्तिमत्व अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे.
याशिवाय सिद्धिविनायक फाउंडेशन बारामती द्वारे त्यांनी ठिकठिकाणी मंदिर उभारणीपासून विविध आश्रमशाळा,मतीमंद शाळांना मदत केली आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रत्येक वाढदिवसानिमित्त बारामतीतील शाळांना वह्या वाटप करत आहेत. आत्तापर्यंत सुमारे 30 हजार वह्यांचे वाटप त्यानी स्वखर्चातून व सिद्धिविनायक फाउंडेशन द्वारे केले आहे. तसेच ज्योतिर्लिंग पतसंस्थेवर ते संचालक असून त्या माध्यमातूनही त्यांनी मोठे काम केले आहे.
आपण करत असलेल्या समाजसेवेला राजकारणाचा आधार मिळावा आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर प्रत्यक्ष काम करता यावं या उद्देशानं त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. विविध समाज आणि संघटनांनी त्यांना पाठिंबा दर्शवत अजितदादांकडे उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे.
अजितदादांची बारामतीच्या विकासाबद्दल असणारी आत्मीयता अनेक वर्ष बारामतीकर अनुभवत आहेत. त्यांच्या या महत्वकांक्षी प्रवासात आपलंही योगदान असावं, विकासाच्या संकल्पना राबवल्या जात असताना आपलंही त्यात वाटा असावा या उद्देशानं आपण नगरपरिषदेच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्याचं ते सांगतात. आजवर समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन सामाजिक कामे करतानाच आता त्यांच्याशी निगडीत प्रश्नांची सोडवणूक करण्याचा आपला मानस असल्याचंही ते नमूद करतात.
दरम्यान, गणेश जोजारे यांच्या उमेदवारीची स्थानिक नागरिकांमध्येही जोरदार चर्चा आहे. त्यांच्यासारख्या जात, धर्म, पंथ या गोष्टी बाजूला ठेवून समाजसेवेला महत्व देणाऱ्या प्रामाणिक व्यक्तिमत्वाला या निवडणुकीत संधी मिळाली पाहिजे अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. दुसरीकडे गणेश जोजारे यांच्या माध्यमातून सोनार समाजालाही पहिल्यांदाच नगरपरिषद निवडणुकीत प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे जोजारे यांच्या उमेदवारीबाबत आतापासूनच चर्चा रंगू लागली आहे.