बारामतीत आनंद लोखंडे याच्याशी संबंधित ठिकाणांवर ईडीचे धाडसत्र
बारामती: एका राजकीय नेत्याची जवळीक सांगून अनेक अधिकाऱ्यांसह उद्योजकांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या लखोबा लोखंडे अर्थात आनंद सतीश लोखंडे हा आता ईडीच्या रडारवर आला आहे. आज आनंद लोखंडे याच्याशी संबंधित ठिकाणांवर ईडीने धाडी टाकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार जळोची, खताळपट्टा आणि झारगडवाडी येथे ईडीने धाड टाकली आहे. त्यामुळं बारामतीसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आनंद लोखंडे याने डेअरी व्यवसायात चांगला फायदा मिळवून देण्याचं आमिष दाखवून, तसेच डेअरीशी संबंधित माल पुरवतो असं सांगून मुंबईतील काही उद्योजकांची फसवणूक केली होती. तसेच त्याने काही अधिकाऱ्यांनाही गंडा घातला होता. याबाबत सर्वात आधी ‘न्यूज कट्टा लाईव्ह’ने वृत्त मालिका प्रकाशित करत लखोबाच्या उद्योगांचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर आज ईडीकडून आनंद लोखंडे याच्याशी संबंधित ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ईडीकडून घरातील कागदपत्रे, आर्थिक व्यवहाराशी निगडीत दस्तऐवज आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
आनंद लोखंडे याच्यावर ३० एप्रिल रोजी सर्वात पहिला गुन्हा दाखल झाला होता. ज्यामध्ये त्याने एका डेअरी कंपनीची दूध आणि दूधाशी संबंधित उत्पादने पुरवण्याच्या नावाखाली १० कोटी रुपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल झाल्यानंतर काहीच दिवसांत आनंद लोखंडे याच्यासह सतीश लोखंडे, विद्या लोखंडे आणि कुटुंबीयांवरही ठिकठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे, माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या पुतण्यालाही १०० कोटी रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी आनंद लोखंडे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, आनंद लोखंडे हा आपण आमदार रोहित पवार यांचा निकटवर्तीय असल्याचं बोललं जात आहे. त्याने आपण या आमदारांचे खास आहोत, त्यांचं सगळं काम पाहतो असं सांगत अनेकांची फसवणूक केली आहे. त्याने आतापर्यंत अनेकांना वेगवेगळी आमिष दाखवत जवळपास ३०० कोटी रुपयांना गंडा घातल्याची चर्चा आहे. त्यामुळं आता या प्रकरणात कुणाकुणाची नावे समोर येतात याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.