बारामतीत चाकूचा धाक दाखवून लुटणारे दोघे जेरबंद; ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

बारामतीत चाकूचा धाक दाखवून लुटणारे दोघे जेरबंद; ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

 

बारामती : बारामती एमआयडीसी परिसरात चाकूचा धाक दाखवून स्कुटीस्वारास लुटणाऱ्या दोन अज्ञात आरोपींचा बारामती तालुका पोलिसांनी पर्दाफाश करून त्यांना जेरबंद केले आहे. या कारवाईत तब्बल ५ लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.

फिर्यादी स्कुटीवरून जात असताना वंजारवाडी ब्रिजजवळ लिंबाच्या झाडाशेजारी मोटारसायकलवर आलेल्या दोन इसमांनी त्यांची गाडी आडवी मारून धारदार शस्त्राने जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्याकडील ३८ ग्रॅम सोन्याच्या बांगड्या आणि ३ ग्रॅम सोन्याची अंगठी हिसकावून आरोपी पळून गेले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत चैतन्य राजेंद्र केकान आणि धीरज हरिश्चंद्र पवार (रा. बारामती) हेच लुटीचे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना अटक करून गुन्ह्यातील दागिने तसेच १ लाख ४० हजार रुपये रक्कम असा एकूण ५ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार, उपअधीक्षक सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या पथकाने केली. या पथकात पो. उपनिरीक्षक दिपाली गायकवाड, धनश्री भगत, ग्रेड पो. उपनिरीक्षक कल्याण शिंगाडे, सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे, मनोज पवार व दादा दराडे यांचा समावेश होता.