बारामती शहरातील बेकायदेशीर अकॅडमींना सहकार्य करणाऱ्या बारामती, इंदापूर, दौंड सह अन्य तालुक्यातील तब्बल १४ शाळांच्या मान्यता रद्द
बारामती: बारामती शहरातील बेकायदेशीर अकॅडमींना सहकार्य करणाऱ्या बारामती, इंदापूर, दौंड, माळशिरस आणि दहीवडी तालुक्यातील तब्बल १४ शाळांना शासनाने दणका दिला आहे. शाळांमधील परीक्षा केंद्र रद्द करून शाळेची मान्यता रद्द करण्याच्या सामाजिक कार्यकर्ते मोहसीन पठाण यांनी केलेल्या मागणीची दखल घेत संबंधित शाळांवर कारवाई करून अहवाल सादर करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
बारामती शहर आणि परिसरात मागील काही दिवसांत खासगी अकॅडमींचे पेव फुटले आहे. शासनाची कोणतीच परवानगी न घेता बेकायदेशीरपणे चालवल्या जाणाऱ्या या अकॅडमींकडून पालकांची अक्षरश: लूट केली जात आहे. अकॅडमीचा विद्यार्थी असल्याची जाहिरात करून पालकांची फसवणूक करण्याचे प्रकार होत आहे. प्रत्यक्षात या अकॅडमींनी अनेक शाळांशी संगनमत करून संबंधित विद्यार्थ्यांचे बोगस प्रवेश दाखवले आहेत. याबाबत सामाजिक कार्यकर्ते मोहसीन पठाण यांनी वारंवार आंदोलन, उपोषण करत शासनाचं लक्ष वेधलं होतं.
संबंधित शाळांमध्ये परीक्षा काळात विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवल्या जातात. तसेच बोर्डाकडून घेतल्या जाणाऱ्या प्रात्यक्षिक परीक्षा संबंधित शाळेत न घेता खासगी अकॅडमींमध्ये घेतल्या जातात. त्यामुळं अशा शाळांमधील परीक्षा केंद्र काढून घेऊन मान्यता रद्द करावी आणि संबंधित संस्थाचालकांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी मोहसीन पठाण यांनी केली होती. त्यावर आता कारवाईच्या सूचना राज्य शासनाकडून देण्यात आल्या आहेत. तसेच याबाबतचा अहवाल सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
कटफळ येथील अजितदादा इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, अंजनगाव येथील क्रिएटिव्ह इंग्लिश मिडियम स्कूल, कोऱ्हाळे बुद्रुक येथील सिद्धेश्वर विद्यालय, बारामती येथील लडकत स्कूल ऑफ फाउंडेशन, पळशी येथील अनंत आशा इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, स्वामी चिंचोली येथील दत्तकला इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, भिगवण येथील कोडिंबा क्षीरसागर ज्युनियर कॉलेज, कळंब येथील साहेबराव फडतरे इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, वालचंद विद्यालय, माळशिरस तालुक्यातील पिरळे येथील श्री भिवाई देवी ज्युनियर कॉलेज, पाटस येथील अंबिका पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, पळसदेव येथील एलजी बनसोडे इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, जंक्शन येथील नंदकिशोर विद्यालय आणि दहिवडी येथील महात्मा गांधी विद्यालय या १४ शाळांबाबत मोहसीन पठाण यांनी तक्रार केली होती.
या तक्रारीवरून संबंधित शाळांची शिक्षण विभागाकडून चौकशी करण्यात आली होती. त्यामध्ये या शाळांमध्ये बोगस प्रवेश दाखवून विद्यार्थ्यांना परीक्षेत मदत केली जात असल्याची बाब उघड झाली होती. तसेच बायोमेट्रिक हजेरी घेण्याचे आदेश असतानाही त्यावर कार्यवाही केली नसल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता या शाळांवर कारवाई करण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे बेकायदेशीर अकॅडमींशी संगनमत करून आर्थिक फायदा करून घेणाऱ्या संस्थांना दणका बसला आहे.