बारामतीकरांच्या मानसन्मानाने जबाबदारी वाढली - नगराध्यक्ष सचिन सातव

बारामतीकरांच्या मानसन्मानाने जबाबदारी वाढली - नगराध्यक्ष सचिन सातव

 


बारामती: बारामतीकरांनी आम्हा सर्वांचे सत्कार करीत मानसन्मान दिला. या सत्काराने आम्हा सर्वांची जबाबदारी अधिक वाढली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील पाच वर्षात मी आणि आम्ही सर्व 41 जण बारामतीकरांनी दिलेली जबाबदारी चांगल्या पद्धतीने यशस्वीपणे पार पाडू. पाच वर्षात कुठेही कमी पडणार नाही. बारामतीकरांच्या हाकेला तत्पर असणार आहोत, असे प्रतिपादन नवनिर्वाचित नगराध्यक्ष सचिन सातव यांनी केले.

बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने नवनिर्वाचित नगराध्यक्ष सचिन सातव आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना सन्मानित करण्यात आले.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी १९६७ सालापासून बारामतीत ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाचे सूत्र ठेवत शहराचा पाया रचत काम केले. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बारामतीची धुरा सोपवली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही, अशा शब्दात नवनिर्वाचित नगराध्यक्ष सचिन सातव यांनी अजित पवार यांचे कौतुक केले. बारामती नगरपरिषद निवडणुकीत बारामतीकरांनी भरघोस मतांनी निवडून दिले. त्या बारामतीकर मतदार जनतेच्या अपेक्षा आम्हाला पूर्ण करावयाच्या आहेत. याच आठवड्यात बारामती नगरपरिषदेचा उपनगराध्यक्षपदासह स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी पार पडतील. त्यामुळे याच आठवड्यापासून आम्हा सर्वांना कामाला लागायचे आहे. केलेल्या सत्काराच्या माध्यमातून जनता डोक्यावर घेत कामाची पोहोचपावती देते. आपल्याला चांगले काम करून नागरिकांच्या अपेक्षांना न्याय द्यायचा आहे. समाजातील सर्व स्तरातील लोकांना घेऊन बारामती शहर घडविण्याचा मानस सातव यांनी व्यक्त केला. त्यासाठी बारामतीकरांनी साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनचे प्रमुख सतीश ननवरे यांनी प्रास्ताविक केले. नगरसेविका श्वेता नाळे, सविता जाधव, आरती शेंडगे गव्हाळे, अमर धुमाळ यांनी मनोगत व्यक्त केले.

रेल्वे सुरू करण्यात येणार
मीरा डावा कालवा सुशोभीकरणाचा नवीन तिरंगा सर्कल ते माळावरच्या देवीचा टप्पा पूर्ण झाला आहे. हा टप्पा पुढे जवळची पर्यंत नेण्यात येणार आहे. सध्या ज्येष्ठ नागरिक संघ ते घारे इस्टेट पर्यंतच्या कालवा सुशोभीकरणाचे काम सुरू झाले आहे. या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून लहान मुलांसाठी रेल्वे सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती नगराध्यक्ष सचिन सातव यांनी दिली.