पाटस – दौंड अष्टविनायक रस्त्यावरील हॉटेल जगदंबामध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; हॉटेलमालक व मॅनेजरवर गुन्हा दाखल

पाटस – दौंड अष्टविनायक रस्त्यावरील हॉटेल जगदंबामध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; हॉटेलमालक व मॅनेजरवर गुन्हा दाखल

 


दौंड : पाटस – दौंड अष्टविनायक रस्त्यावर असलेल्या दौंड तालुक्यातील गिरीम गावाच्या हद्दीतील मांढरेमळा परिसरात असलेल्या हॉटेल जगदंबामध्ये गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेला हॉटेल मालक आणि मॅनेजर ला जबाबदार धरत दौंड पोलीसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

ही माहिती पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली. हॉटेल मालक किरण आबा सौताडे व मॅनेजर लहु विश्वनाथ जानभरे ( दोघे रा. राशीन ता. कर्जत जि. अहिल्यानगर ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पाटस ते दौंड अष्टविनायक रस्त्यालगत गिरीम गावच्या हद्दीत असलेल्या प्रसिद्ध हॉटेल जगदंबा मध्ये बुधवारी (दि ७) दुपारी एक वाजण्याच्या आसपास हॉटेलमध्ये स्वयंपाकाचे काम चालू असताना अचानक गॅस सिलेंडर च्या टाकीचा स्फोट झाला. 

या भीषण स्फोट दुर्घटनेत हॉटेलमध्ये बारा कर्मचारी भाजल्याने जखमी झाल्याची घटना घडली होती. दहा कर्मचारी या दुर्घटनेत गंभीररित्या भाजले आहेत. यापैकी सहा कर्मचारी हे जवळपास 80% च्या वर भाजले आहेत. त्यांच्यावर पुणे येथील शासकीय ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर उर्वरित चार जखमी कर्मचाऱ्यांना दौंड शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

या गॅस सिलेंडर स्फोटाला हॉटेल जगदंबाचा मालक किरण सौताडे व मॅनेजर लहु जानभरे हे दोघे जबाबदार असून या दोघांनी स्वयंपाक घरात ज्वलनशील पदार्थाबाबत निष्काळजीपणा केला तसेच घरगुती वापराच्या भारत गॅस कंपनीचे विनापरवाना १२ गॅस सिलेंडर ठेवले, तसेच १० गॅस सिलेंडर हे व्यावसायिक होते. तब्बल २२ गॅस सिलेंडर ठेवले होते.

ज्वलनशील पदार्थ हाताळण्याची कोणतीही काळजी घेतली गेली नाही. त्यामुळे घरगुती वापराच्या एका गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन हॉटेलमध्ये काम करणारे दहा कर्मचारी भाजले. त्यामुळे दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार महेश भोसले यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर हॉटेलचा मालक आणि मॅनेजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बिद्री हे करत आहेत.भाजलेल्या जखमी कर्मचाऱ्यांची नावे. कन्हैया वर्मा, वरूण वर्मा, दीपक कुमार, मोहन कुमार हरिसिंग कुमार, छोटे कुमार, मोहन वर्मा, बिबीन निसाद, धर्मा निसाद, पंकज कुमार निसाद. सर्व पुरुष कामगार हे रघुवनसुपरा ता. यादवपूर जि. आग्रा (उत्तरप्रदेश) येथील रहिवासी आहेत.

सीमा मच्छिंद्र पाचपुते या स्थानिक गिरीम गावच्या महिला या हॉटेलमध्ये भाकरी बनवण्याचे काम करतात. घटनेची माहिती मिळताच दौंड तालुका आरोग्य विभागाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ उज्वला जाधव, आरोग्य विभागाचे विस्तार अधिकारी डॉ दिलीप जगताप यांनी जखमी रुग्णांची भेट घेऊन तपासणी केली. सध्या चार रुग्ण आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली दौंड येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात आणि खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहेत.