‘तर ट्रम्प मोदींचे अपहरण करून त्यांना घेऊन जातील...’, पृथ्वीराज चव्हाणांचे वादग्रस्त विधान; राजकीय वर्तुळात खळबळ
काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?
अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्यावर केलेल्या कारवाईवर भाष्य करताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘व्हेनेझुएलामध्ये जे काही घडले, तसे काही भारतातही घडू शकते का? ट्रम्प साहेब आपल्या पंतप्रधानांचेही अपहरण करून घेऊन जातील का? आता फक्त तेवढेच बाकी उरले आहे.’
याशिवाय, अमेरिकेने भारतावर लादलेल्या ५० टक्के आयात शुल्कावर (टॅरिफ) बोलताना ते म्हणाले की, ‘इतक्या मोठ्या करासह व्यापार करणे अशक्य आहे. हे एक प्रकारचे निर्बंधच असून भारताच्या निर्यातीला रोखण्यासाठी वापरलेले शस्त्र आहे. भारताला याचे मोठे परिणाम भोगावे लागतील.’
भाजपचा पलटवार: ‘मानसिक दिवाळखोरीचे लक्षण’
चव्हाणांच्या या विधानावर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी ही टीका ‘मानसिक दिवाळखोरी’ असल्याचे म्हटले आहे. ‘काँग्रेस नेत्यांच्या विचारांची पातळी खालावली आहे. देशाच्या पंतप्रधानांबाबत अशा प्रकारचे हीन विधान करणे हे त्यांच्या वैचारिक दिवाळखोरीचे लक्षण आहे,’ अशा शब्दांत पूनावाला यांनी हल्लाबोल केला.
सोशल मीडियावर तीव्र पडसाद
सोशल मीडिया वापरकर्त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाला 'हास्यास्पद' आणि ‘अतार्किक’ ठरवले आहे. अण्वस्त्रसज्ज असलेल्या भारतासारख्या महासत्तेची तुलना व्हेनेझुएलाशी करणे चुकीचे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. जम्मू-काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक एस. पी. वैद यांनी देखील हे विधान देशासाठी लज्जास्पद असल्याचे म्हटले आहे.
नेमकी पार्श्वभूमी काय?
नुकतेच अमेरिकेच्या विशेष दलाने व्हेनेझुएलामध्ये घुसून राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतले होते. त्यांच्यावर ‘नार्को-टेररिझम’चे आरोप ठेवून त्यांना अमेरिकेत नेण्यात आले आहे. या कारवाईचा रशिया, चीन आणि भारतासह अनेक देशांनी निषेध केला आहे. याच मुद्द्यावरून भारतात आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे.