राष्ट्रवादीच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी संभाजी होळकर यांची निवड; बारामती, दौंड, इंदापूर आणि पुरंदर तालुक्याची जबाबदारी

राष्ट्रवादीच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी संभाजी होळकर यांची निवड; बारामती, दौंड, इंदापूर आणि पुरंदर तालुक्याची जबाबदारी

 

बारामती: जिल्हा बँकेचे संचालक आणि राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांची पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्यावर बारामती, दौंड, इंदापूर आणि पुरंदर या चार तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. संघटनेच्या कामात कठोर मेहनत घेण्याची तयारी असलेल्या संभाजी होळकर यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

संभाजी होळकर यांनी यापूर्वी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसचे अध्यक्ष, होळचे सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती, संजय गांधी निराधार योजना समिती, राष्ट्रवादीचे बारामती तालुकाध्यक्ष म्हणून यशस्वीरीत्या काम केले आहे. सध्या ते जिल्हा बँकेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यावर पक्षाने आता राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली असून बारामती, दौंड, इंदापूर आणि पुरंदर या चार तालुक्यांचे कार्यक्षेत्र त्यांच्याकडे देण्यात आले आहे. आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संभाजी होळकर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

संभाजी होळकर यांनी संघटनेचे काम अतिशय ताकदीने करून पक्षाला बळकटी देण्यासाठी कायम प्रयत्न केले आहेत. पक्ष संघटनेचे काम करताना त्यांनी आपले संघटन कौशल्य दाखवून दिले आहे. मागील काळात त्यांनी अनेक योजनांवरही काम करत आपले कौशल्य दाखवून दिले आहे. पक्षाने दिलेल्या संधीच्या माध्यामातून कार्यक्षेत्रात राष्ट्रवादीचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू असे सांगत त्यांनी पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे आभार मानले आहेत.