संभाजी होळकर यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणून कमला केली सुरुवात.. बारामतीत अजितदादा सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण या पद्धतीने कामकाज  करण्याचे जाहीर

संभाजी होळकर यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणून कमला केली सुरुवात.. बारामतीत अजितदादा सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण या पद्धतीने कामकाज करण्याचे जाहीर

 

बारामती: बारामती तालुक्याच्या अध्यक्षपदाची दीर्घकाळ जबाबदारी सांभाळल्यानंतर संभाजी होळकर यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून आपल्या कामाला सुरुवात केली आहे. त्यांच्या निवडीनंतर गावोगावी सत्कार होत असतानाच त्यांनी आपल्या भविष्याच्या वाटचालीबद्दल भाष्य केलं आहे. पक्ष संघटनेत आदर्शवत काम कसं केलं जातं हे आपण दाखवून देणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्याचवेळी बारामतीच्या बाबतीत मात्र अजितदादा सांगतील तेच धोरण आणि बांधतील तेच तोरण या तत्वावर काम होईल यावर त्यांनी शिक्कामोर्तब केलं आहे.

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी संभाजी होळकर यांच्यावर सोपवली आहे. बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर-हवेली या विधानसभा मतदारसंघांचा कार्यभार त्यांच्याकडे देण्यात आला आहे. संभाजी होळकर यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सर्वच स्तरातून समाधान व्यक्त होत असून गावोगावी सत्कार समारंभ होत आहेत. होळकर यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संभाजी होळकर यांनी आगामी वाटचालीबाबत भावना व्यक्त केल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवार यांचे आभार मानत संभाजी होळकर यांनी पक्ष संघटनेत उत्कृष्ठ पद्धतीने काम करून राज्यात वेगळा आदर्श निर्माण करण्याचा आपला मानस असल्याचे नमूद केले. वेगवेगळ्या निवडणुका, संघटनात्मक कार्यक्रम यामध्ये राष्ट्रवादीचा वरचष्मा राहावा यासाठी आपले विशेष प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

सामान्य कार्यकर्ता ते पदाधिकारी यांची सांगड घालून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर आपला भर असेल असे सांगून संभाजी होळकर यांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष पहिल्या क्रमांकावर ठेवण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी सर्व मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधून सर्वसमावेशक धोरण आखले जाईल असेही त्यांनी जाहीर केले.

बारामतीत अजितदादांचाच निर्णय अंतिम

बारामतीबाबत बोलताना त्यांनी वेगळा निर्णय जाहीर केला आहे. बारामती हा अजितदादांचा हक्काचा तालुका आहे. या ठिकाणी पक्ष संघटना म्हणून सर्वसमावेशक काम करण्यावर भर दिला जाणार आहे. त्याचवेळी पक्षातील पदे, विविध संस्थांमधील पदाधिकारी निवडी आणि आवश्यक जबाबदाऱ्या याबाबत अजितदादा सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण यांचा पद्धतीने कामकाज केले जाईल असेही त्यांनी जाहीर केले आहे.

दरम्यान, संभाजी होळकर यांचा पक्ष संघटना आणि प्रशासनामध्ये गाव पातळीपासून जिल्हा व राज्य स्तरापर्यंत कामाचा अनुभव पक्षासाठी फायदेशीर ठरणार आहे. त्याचबरोबर विकासाच्या योजनांबद्दल असणारी माहिती, त्यासाठी आवश्यक प्रक्रिया याचा अभ्यास हाही संबंधित मतदारसंघांसाठी उपयोगी ठरणार आहे. त्यामुळं संभाजी होळकर यांची निवड ही कार्यकर्त्यांसाठी समाधान देणारी बाब ठरली आहे.