पॅरिसच्या मुख्य चौकात 'जय शिवराय'चा जयघोष! युरोप दौऱ्यावर गेलेल्या ५२ शेतकऱ्यांनी सातासमुद्रापार साजरी केली शिवजयंती
संगमनेर येथील शिवभक्त संतोष डोंगरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो सोबत आणला होता. पॅरिसच्या प्रमुख चौकामध्ये शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन अहिल्यानगरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, प्रगतशील शेतकरी विजया अंबाडे, संतोष डोंगरे, तालुका कृषी अधिकारी क्रांती चौधरी तसेच आंबेगाव तालुक्यातील शेतकरी ऋषिकेश गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारताचा तिरंगा ध्वज शिवरायांच्या प्रतिमेमागे लावण्यात आला होता.
यावेळी बोलताना बोराळे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज हे शेतकऱ्यांचा सार्थ अभिमान आहेत. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी शेतकऱ्यांना संरक्षण व प्रोत्साहन दिले. आज सात समुद्रापार पॅरिसमध्ये शिवजयंती साजरी करताना आम्हाला अभिमानासह आनंद होत आहे.”
पॅरिसमध्ये शिवजयंती साजरी करण्याची संधी मिळाल्याबद्दल शेतकऱ्यांनी कृषी विभागाचे आभार मानले. “हा प्रसंग आमच्या कायमस्वरूपी स्मरणात राहील,” असे ऋषिकेश गावडे यांनी सांगितले.
या दौऱ्यात अशोक दरेकर (नारायणगाव), निलेश धपाटे, संभाजी नरुटे, दीपक गलांडे, शिवाजी तरंगे (सर्व इंदापूर) तसेच संतोष डोंगरे (संगमनेर) यांच्यासह अन्य शेतकरी सहभागी झाले आहेत.