टिपू सुलतान वादावर हर्षवर्धन सपकाळांकडून दिलगिरी
मालेगाव महापालिकेतील उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावण्यावरून महाराष्ट्रात वाद सुरु झाला होता. याचदरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तुलना करून नव्या वादाला तोंड फोडले. यावर प्रतिक्रिया देताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर टीका केली. इतकेच नव्हे तर अनेक पक्षातील राजकीय मंडळींनी सपकाळ यांच्यावर टीका केली. अखेर आज सपकाळ यांनी फेसबुक पोस्टवरून दिलगिरी व्यक्त केली.
हर्षवर्धन सपकाळ आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहितात की...
शिवप्रेमी बंधू-भगिनींनो, सप्रेम नमस्कार, सरकारी कार्यालयांमध्ये विविध महापुरुषांचे फोटो एकत्र लावल्याने समाजात तेढ निर्माण होणार नाही, तर ऐक्याचा संदेश जावा, या आशयाचे माझे ७० सेकंदांचे वक्तव्य होते. दुर्दैवाने, त्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवून मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घालण्यात आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली, असा चुकीचा समज निर्माण करण्यात आला. भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या पिलावळीकडून हा अपप्रचार नियोजनपूर्वक पसरवण्यात आला. त्याआधारे राज्यात धार्मिक तेढ निर्माण करून दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला हे आपण पुण्यात पाहिले आहे.
मी पुन्हा एकदा स्पष्ट आणि ठामपणे सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे. ते माझे आदर्श, प्रेरणास्थान आणि स्वाभिमान आहेत. त्यांच्या तुलनेचा प्रश्नच उद्भवत नाही,मी केलेली नाही. टिपू सुलतानांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन इंग्रजाविरूद्ध लढा दिल्याचे मी म्हटले होते. त्यांच्या योगदानाची दखल घेत थेट भारताच्या संविधानामध्ये देखील त्यांची तसबीर आहे त्यांच्या प्रतिमेच्या संदर्भात समाजात तणाव वाढू नये, सर्वांनी परस्पर सन्मान आणि बंधुभाव जपावा, हा माझ्या वक्तव्याचा गाभा होता. इतिहासावर मतभेद असू शकतात; मात्र त्यावर संयत, अभ्यासपूर्ण चर्चा व्हावी आणि समाजात संघर्ष निर्माण होऊ नये,जात-धर्म-पंथावर ध्रुवीकरण अजिबात खपवून घेता कामा नये,हीच भूमिका मी मांडली होती.
मनःपूर्वक खेद, दिलगीरी व्यक्त
प्रकरणी भाजपचा तीव्र शब्दात निषेध करतो त्यांच्या गलिच्छ खोडसाळपणामुळे काही शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या, त्याबद्दल मी मनःपूर्वक खेद व्यक्त करतो. माझ्या शब्दाचा गैरवापर केल्याबद्दल शिवप्रेमींप्रती दिलगीरी व्यक्त करतो. कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचवण्याचा माझा हेतू नव्हता. शिवजयंती दोन दिवसांवर आली आहे, आपण सर्वांनी गैरसमज दूर ठेवूया, अपप्रचाराला बळी पडू नका. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला स्वराज्य, सहिष्णुता आणि लोककल्याणाचा मार्ग स्वीकारून परस्पर आदर, ऐक्य आणि समन्वयाने महाराष्ट्र घडवूया ही नम्र विनंती. आणी पुढे भाजपाच्या विखारी, खोडसाळ अपप्रचाराविरुद्ध लढत राहू भाजपच्या विकृतीला व ट्रेड-दिल व जेफ़री एपस्टीन घोटाळा चव्हाट्यावर आणत राहू!