“अजून २० तास थांबा, तुम्हाला…”, विमान अपघातप्रकरणी रोहित पवारांकडे मोठा पुरावा? म्हणाले…

“अजून २० तास थांबा, तुम्हाला…”, विमान अपघातप्रकरणी रोहित पवारांकडे मोठा पुरावा? म्हणाले…

 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. या निधनानंतर विमान अपघाताविषयी संशय निर्माण केला जात आहे. हा अपघात नसून घातपात असल्याचं म्हटलं जातंय. आमदार रोहित पवार यांनी हे प्रकरण लावून धरलं असून याविषयी ते सातत्याने शंका निर्माण करत आहेत. त्यातच, उद्या ते पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा गौप्यस्फोट करणार असल्याचा दावा त्यांच्याकडून करण्यात आलाय. आत सेशन कोर्टात ईडीच्या प्रकरणी सुनावणीकरता गेले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

विलीनीकरापेक्षा अपघाताचा विषय महत्त्वाचा

“आता विषय कोणता महत्त्वाचा आहे? अपघाताचा विषय महत्वाचा आहे. आम्ही विलीनीकरणावर चर्चा करू शकतो, कारण आमच्याकडे पुरावे आहेत. मेसेज, व्हिडिओपासून फोनवर काय बोलणं झालंय हे सर्व आमच्याकडे आहे. परंतु, यावर आता बोलणार नाही. उद्या ब्लॅक बॉक्ससह इतर विषयांवर सखोल पत्रकार परिषद घेणार आहोत”, असं रोहित पवार म्हणाले.

उद्या सर्व डिटेल माहिती देणार

अजित पवारांचा घातपातच आहे, यावर तुम्ही ठाम आहात का? असा प्रश्न रोहित पवारांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “अजून २० तास तुम्ही थांबा, उद्या साडेदहा वाजता याबाबतीत चर्चा करू. तपास अत्यंत धीम्यागतीने चालू आहे. तपासातून काहीच निष्पन्न होत नाही. वीसीआर कंपनी अद्यापही ऑपरेशनमध्ये आहे. सरकारकडून या तपासात दुर्लक्ष होतंय का, भारताबाहेर ब्लॅक बॉक्स पाठवावं लागेल, या सर्वाची माहिती देण्याकरता उद्या सकाळी पत्रकार परिषद घेणार आहे, असं रोहित पवार म्हणाले.

ब्लॅक बॉक्स राजकारणापासून सुरक्षित नाही

दरम्यान, विमान अपघातात आगीत ब्लॅक बॉक्स जळाल्याचे वृत्त आहे. याबाबत पत्रकारांनी विचारलं असता, रोहित पवार म्हणाले, “ब्लॅक बॉक्स पाऊस, आग, उन्हापासून सुरक्षित आहे, पण राजकारणापासून सुरक्षित नाही. उद्या डिटेलमध्ये जाऊन काय घडलं असावं, कोणत्या नवीन गोष्टी आमच्यापर्यंत आल्या आहेत ती माहिती उद्या देणार आहे”, असंही ते म्हणाले.