सुनेत्रा पवार होणार राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष
उपमुख्यमंत्री अजित पवार हे दर मंगळवारी पक्षाच्या आमदारांची साप्ताहीक बैठक मुंबईत घेत असत. तशी पहिली बैठक उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज घेतली. देवगिरी या त्यांच्या शासकीय निवासस्थानी रात्री ही बैठक पार पडली. या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. बैठकीतील ४३ आमदारांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाला एकमुखी पाठिंबा दिला.
राष्ट्रवादीचे विधानसभेत ४० आणि ७ विधानपरिषदेचे आमदार आहेत. आजच्या बैठकीला अमोल मिटकरी, आदिती तटकरे, विक्रम काळे, राजु कारेमोरे, सना मलिक हे पाच आमदार गैरहजर होते. अजित पवार यांना जसा पाठींबा होता, तसा सुनेत्रा पवार यांना पाठिंबा असेल, असे आमदारांनी यावेळी सांगितले. तुमच्या अडचणी सोडवण्याचा मी दादांप्रमाणे प्रयत्न करीन, अशी ग्वाही सुनेत्रा पवार यांनी दिली. या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या संदर्भात चर्चा झाली नाही. विलिनीकरणाच्या संदर्भात माध्यमांमध्ये बोलू नये, अशा सूचना बैठकीत दिल्या गेल्या.
२८ जानेवारी रोजी अजित पवार यांचे विमान अपघातामध्ये निधन झाले. ३१ जानेवारी रोजी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा जोरदार होत्या. मात्र विलीनकरण मुद्दा आता बाजुला पडला असून अजित पवार यांच्याकडे असणारी पक्षाध्यक्ष व उपमुख्यमंत्री अशी दोन्ही पदे सुनेत्रा पवार यांच्याकडे आली आहेत.
राष्ट्रवादीचे विद्यमान कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचे नाव पक्षाच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत होते. तसेच शरद पवार गट विलीन झाल्यास त्यानंतर पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे जातील, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आजच्या बैठकीनंतर या शक्यता आता मावळल्या आहेत. अजित पवार यांच्याप्रमाणे पक्षाध्यक्ष पदही सुनेत्रा यांच्याकडे आले आहे.
पहिल्या महिला :
महाराष्ट्रात पहिल्या उपमुख्यमंत्री तसेच पक्षाच्या महिला अध्यक्ष हाेण्याचा विक्रम अखेर सुनेत्रा अजित पवार यांच्या नावावर नोंदवला जाणार आहे. अद्याप सुनेत्रा यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. त्या बारामती येथून विधानसभेची पोटनिवडणूक लढवतील. त्यानंतर त्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देणार असून त्यांच्या जागी त्यांचा मुलगा पार्थ पवार यांची राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे.