आमदार रोहित पवार यांची संध्याकाळी ४ वाजता मुंबईत पत्रकार परिषद; अजित पवारांच्या मृत्यूबद्दल मोठा खुलासा होणार?
मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली मृत्यूने महाराष्ट्राला मोठा धक्का बसला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेला अजित पवार सकाळी मुंबईहून बारामतीच्या दिशेने निघाले होते. मात्र बारामतीत त्यांचे विमान लँडिंग होण्यापूर्वी मोठा अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर अनेकांच्या मनात विविध प्रश्न आहेत. परंतु पवार कुटुंबातील कुणीच या अपघातावर बोलले नव्हते. मात्र आता अजित पवारांचे पुतणे रोहित पवार पुढे आले आहेत.
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवारांनी तात्काळ माध्यमांशी संवाद साधत हा अपघात असल्याचे म्हटलं होते. मात्र आता आमदार रोहित पवार संध्याकाळी ४ वाजता मुंबईत पत्रकार परिषद घेत आहेत. रोहित पवारांनी पोस्ट करून माहिती दिली की, बारामतीतील विमान अपघातात झालेल्या अजितदादांच्या दुर्दैवी निधनाबाबत महाराष्ट्रासह माझ्याही मनात अनेक शंका आहेत. यासंदर्भात आज सायंकाळी ४ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाचे आणि डोळे उघडणारे मुद्दे तपशीलवार मांडणार आहे असं त्यांनी सांगितले. त्यामुळे अजित पवारांच्या मृत्यूबद्दल मोठा खुलासा होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
पवार कुटुंबातील व्यक्ती पहिल्यांदाच अपघातावर करणार भाष्य
अजित पवारांच्या निधनानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला. त्यात अजितदादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुंबईत दादांच्या जागी उपमुख्यमंत्री कोण होणार यासाठी वर्षा बंगल्यावर राष्ट्रवादी नेते सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत चर्चा केली. त्यानंतर ३१ तारखेला अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी पार पडला. मागील १३ दिवसांपासून अजित पवारांच्या अपघातावर शरद पवार वगळता पवार कुटुंबातील कुणीही भाष्य करणे टाळले होते. या अपघातावर आजही अनेक जण संशय व्यक्त करत आहेत. मात्र अधिकृत माहितीशिवाय मी यावर बोलणार नाही असं शरद पवारांनी म्हटलं होते. त्यात रोहित पवार प्रेझेंटेशन देत आज पत्रकार परिषदेत अपघातावर प्रश्न उपस्थित करणार आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही अजित पवार यांच्या निधनाबाबत शंका उपस्थित केली होती. अजित पवार यांचा घातपात करण्यासाठी विमानात सुसाईड बॉम्बरचा वापर करण्यात आला असावा का?, या विमानाच्या वैमानिकालाही संमोहित करण्यात आलं होतं का?, अजित पवार प्रवास करत असलेल्या विमानामधून सहा प्रवासी प्रवास करत असल्याचे सांगण्यात येत होते. मग पाच जणांचा मृत्यू झाला, त्यातला सहावा प्रवासी कुठे गेला यासारखे विविध प्रश्न मिटकरी यांनी उपस्थित केले आहे. त्याशिवाय डीजीसीए ने विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज प्रसारित करून दादाच्या आगमनापासून विमानात बसेपर्यंत प्रत्यक्षदर्शी पुरावा सादर करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.