“महाराष्ट्रात २५५ मराठी शाळा बंद पडल्या आहेत, ही स्थिती अत्यंत…”; सुप्रिया सुळे यांनी पोस्ट लिहून व्यक्त केली खंत

“महाराष्ट्रात २५५ मराठी शाळा बंद पडल्या आहेत, ही स्थिती अत्यंत…”; सुप्रिया सुळे यांनी पोस्ट लिहून व्यक्त केली खंत

 

मुंबई: मराठी शाळांबाबत महाराष्ट्र सरकारने जी माहिती दिली त्याबाबत आता सुप्रिया सुळे यांनी पोस्ट लिहिली आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे पण शिक्षणाच्या परिघातून मराठी भाषा हळूहळू दूर होत चालली आहे असं म्हणत सुप्रिया सुळेंनी खंत व्यक्त केली आहे.

सरकारकडे काय विचारणा करण्यात आली आहे?

राज्यात कमी पटसंख्येमुळे २ हजार मराठी शाळा अडचणीत आल्या असून त्यापैकी ६२० शाळा बंद होणार असल्याने २५ हजार शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. कोकण विभागात ७००, विदर्भात ८०० हून अधिक, पश्चिम महाराष्ट्रात ७०० हून अधिक, मराठवाड्यात ४००, उत्तर महाराष्ट्रात ३०० हून अधिक मराठी शाळा बंद होण्याच्या स्थितीत आहेत. डिसेंबर २०२५ मध्ये ६२० मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याचा परिणाम म्हणून ७० गावांमध्ये ना शाळा, ना पाटी पेन्सिल अशी स्थिती निर्माण झाली आहे. मराठी शाळा वाचवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षक, विद्यार्थी आणि संस्था चालकांनी लाखोंच्या संख्येने मोर्चा काढून महाराष्ट्र शासनास निवेदन सादर केलं आहे. या सगळ्यावर कुठली कार्यवाही किंवा उपाययोजना करण्यात आली आली आहे किंवा येणार आहे? नसल्यास कारणं काय त्याची माहिती द्यावी

मराठी शाळांबाबत सुप्रिया सुळे यांची पोस्ट काय?

महाराष्ट्रातील पालकांचा कल इंग्रजी शाळांकडे वाढत असल्याने मराठी शाळा बंद पडत असल्याची स्थिती असल्याचे शासनाने सभागृहात कबूल केले. राज्यातील तब्बल २५५ शाळा मागील दोन वर्षांत बंद पडल्या आहेत. महाराष्ट्रातच मराठी भाषेच्या शाळांची ही स्थिती होणे अतिशय गंभीर आणि खेदजनक आहे. एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर दुसरीकडे शिक्षणाच्या परिघातून मराठी भाषा हळूहळू दूर होतेय असे चित्र दिसते. अभिजात भाषेच्या विकासासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून मिळणारा निधी मराठी भाषेतून शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी वापरता येऊ शकतो. शासनाने याबाबत गांभीर्याने विचार करुन मराठीतून शिक्षण अधिकाधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण करण्यासाठी काम करावे. मराठी भाषेची पताका फडकवत ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे.

राज्यातील २५५ शाळा बंद झाल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली आहे

दरम्यान याबाबत मंत्री दादा भुसे यांनी असं उत्तर दिलं आहे की विचारण्यात आलेली माहिती अंशतः खरी आहे. पण मराठी शाळा बंद करण्याचा कुठलाही निर्णय शासन स्तरावर घेण्यात आलेला नाही. सिंधुदुर्गात मोर्चा काढण्यात आल्याची बाबही खरी आहे असंही उत्तर भुसे यांनी दिलं आहे. पालकांचा कल इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये पाल्यांचा प्रवेश घेण्यासाठी वाढत असल्याने मागील दोन वर्षांच्या तुलनेत कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र भागातील २५५ मराठी शाळा बंद झाल्या आहेत. या उत्तरानंतरच सुप्रिया सुळे यांनी एक पोस्ट लिहून खंत व्यक्त केली आहे.