अजित पवार विमान अपघात प्रकरणात डीजीसीएने ची मोठी कारवाई! व्हीएसआर व्हेंचर्सची ४ विमाने केली ग्राउंड
बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले. यानंतर आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने व्हीएसआर या अपघात प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. डीजीसीएने व्हीएसआर व्हेंचर्स या विमान कंपनीची चार विमाने ग्राउंड करण्याचे आदेश दिले आहेत.
अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर या कंपनीचे विशेष सुरक्षा ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या ऑडिटमध्ये समोर आलेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे. २८ जानेवारी रोजी बारामती विमानतळापासून काही अंतरावर झालेल्या लिअरजेट ४५ या विमानाच्या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान या ऑडिट पथकाला सुरक्षा नियमांचे अनेक उल्लंघन झाल्याचे आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर, मंगळवारी ठराविक नोंदणी क्रमांक असलेली लिअरजेट ४०/४५ (Learjet 40/45) विमाने ग्राउंड करण्याचे आदेश डीजीसीएकडून देण्यात आले आहेत.
“२८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे M/s व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या लिअरजेट ४५ (VT-SSK) विमानाला झालेल्या अपघातानंतर, डीजीसीएने या संस्थेच्या विशेष सुरक्षा ऑडिटचे आदेश दिले होते. मल्टि-डिसीप्लिनरी ऑडिट टीमला संस्थेच्या विमानांची उड्डाण करण्याची योग्यता (Airworthiness), हवाई सुरक्षा आणि फ्लाइट ऑपरेशन्स या विभागांमध्ये मान्यता असलेल्या अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले,” असे डीजीसीएने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान आढळून आलेले नियमांचे उल्लंघन आणि विमानांच्या देखभाल प्रक्रियेतील त्रुटी लक्षात घेता, डीजीसीएने कारवाईचा निर्णय घेतला. जोपर्यंत सुरक्षेचे सर्व निकष पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत VT-VRA, VT-VRS, VT-VRV आणि VT-TRI रजिस्ट्रेशन असलेल्या लिअरजेट ४०/४५ विमानांचे उड्डाण तत्काळ थांबवण्याचा निर्णय घेतला.