“अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही, पण…”, राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबाबत रोहित पवारांचे महत्त्वाचे वक्तव्य

“अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही, पण…”, राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबाबत रोहित पवारांचे महत्त्वाचे वक्तव्य

 

बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पक्षामध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. असे असले तरी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांची निवड करण्यात आली असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी केले होते. त्यानंतर आपण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही. तसेच आपण या स्पर्धेत नाही, असे पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी स्पष्ट करत नेतृत्वाच्या वादातून काढता पाय घेतला. दरम्यान रोहित पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष कोण असावा याबाबत वक्तव्य केले आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अजित पवारांना विलिनीकरण हवं होतं अशी भूमिका मांडली जात आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून त्याबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली जात नसल्याचं चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विलिनीकरण आता होऊ शकतं का? असा प्रश्न रोहित पवार यांना विचारण्यात आला होता. यावर बोलताना ते म्हणाले की, “विलिनीकरण का होणार होतं? कशासाठी होणार होतं? दादांच्या मनामध्ये आणि आमच्या मनामध्ये ती इच्छा का होती? आम्ही का प्रयत्न करत होतो? त्याला राजकीय अंग आहे की भावनिक अंग आहे? हे सर्व मी १२ तारखेला सांगेल. तसेच व्यक्तिगत मी म्हणून विलिनीकरणाबाबत पुढे काय व्हावं किंवा होईल हे देखील सांगेल” असे रोहित पवार म्हणाले.

पवार कुटुंबात राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण व्हावा याबाबत काही चर्चा झाली आहे का? या प्रश्नवर देखील रोहित पवार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, “त्या बाबतीतील कोणतीही चर्चा पवार परिवारात झालेली नाही. पण जेव्हा ही दुखद घटना घडली तेव्हा काही दिवस तर आम्हाला काहीच सुचत नव्हतं. आमच्या डोक्यामध्ये कुठलाही राजकीय विचार येत नव्हता. पण मनामध्ये एकमात्र होतं की अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. पण सुनित्राकाकींकडे बघत असताना, त्या परिवाराचा एक भाग म्हणून सुनित्राकाकींमध्ये मी अजितकाकांना बघतो. त्यामुळे त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळणं आणि इतरही खाती त्यांना मिळाली पाहिजेत अशी मनोमन इच्छा होती. तसेच दादांची जी पोझिशन त्या पक्षात होती, ती म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष दादा होते. ते पदही सुनेत्रा काकींनाच मिळाले पाहिजे अशी इच्छा माझ्या मनात आहे,” असे रोहित पवार म्हणाले.

विलिनिकरणाच्या चर्चांबाबत पार्थ पवार किंवा सुनेत्रा पवार याच्याशी काही बोलणं झालं आहे का? किंवा त्यांनी काही महिती घेतली आहे का? याबद्दल बोलताना रोहित पवार म्हणाले की, “अजूनपर्यंत सुनेत्राकाकी असतील, पार्थ, जय किंवा आम्ही सर्व कोणीही या दु:खातून सावरलेलो नाहीत. राजकीय विचार मनात येत नाहीयेत, कारण घटनाच इतकी दुर्दैवी होती. हळूहळू जसे राजकीय विचार करण्याची क्षमता आमच्यात येईल, तसे मी याबाबत स्पष्ट सांगेन. पण आत्तापर्यंत दोन्ही परिवारामध्ये किंवा पवार परिवार एकत्र म्हणून कुठेही राजकीय चर्चा झालेली नाही. ९ तारखेनंतर सुरूवात होईल असे वाटते,” असे रोहित पवार म्हणाले.

१० तारखेला विमानाबाबत असलेल्या शंका प्रझेंटेशनच्या माध्यमातून मुंबई येथे लोकांसमोर मांडेन आणि १२ तारखेला विलिनीकरणाबाबत काय घडलं? दादांची काय इच्छा होती? हे लोकांसमोर घेऊन येईल, असेही रोहित पवार म्हणाले.