राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांची निवड

 

अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची निव़़ड करण्यात आली आहे. आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली आहे. तसेच सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष पुन्हा घेईल, असा विश्वासही प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला. 

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारी रोजी बारामतीजवळ झालेल्या एका भीषण विमान अपघातात निधन झालं होतं. अजित पवार यांच्या निधनानंतर उदभवलेल्या कठीण परिस्थिती सुनेत्रा पवार यांनी नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारत राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र अजितदादांच्या पश्चात राष्ट्रवादी अजित पवार गटाचं काय होणार, विलिनीकरणाची प्रक्रिया कशी राबवली जाणार याबाबत अनेक सवाल उपस्थित केले जात होते. अखेरीस आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याचा निर्णय़ जाहीर करण्यात आला. ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली.