महाराष्ट्रातील ५० हजार ते १ लाख मुस्लीम बांधव सौदी अरेबियात अडकले

महाराष्ट्रातील ५० हजार ते १ लाख मुस्लीम बांधव सौदी अरेबियात अडकले

 

मुंबई: रमजान काळात उमरा या धार्मिक विधीसाठी महाराष्ट्रातून सौदी अरेबियात गेलेले ५० हजार ते १ लाख मुस्लीम बांधव अडकले असल्याची भीती राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी व्यक्त केली. राज्य अल्पसंख्यांक आयोगाने यासंदर्भात तातडीने हालचाली सुरू करत सर्वांना सुरक्षित परत आणण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. यंदा राज्यातील सुमारे ५०० टूर ऑपरेटर्सनी उमरा या धार्मिक विधीसाठी यात्रेकरूंना पाठवले असून, त्यापैकी केवळ मुंबईतूनच १००हून अधिक ऑपरेटर्स सक्रिय होते, अशी माहिती समोर आली आहे.

उमरासाठी मोठ्या संख्येने गरीब आणि मध्यमवर्गीय मुस्लीम बांधव प्रवास करतात. युद्धजन्य परिस्थितीमुळे त्यांचा सौदी अरेबियातील मुक्काम वाढल्यास आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात, अशीही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय दूतावास त्यासाठी प्रयत्न करत असून, अधिक समन्वयाची गरज असल्याचे आयोगाने नमूद केले.

रमजानच्या पार्श्वभूमीवर ‘उमरा’ या धार्मिक विधीसाठी मक्का-मदीना येथे गेलेल्या महाराष्ट्रातील मुस्लीम बांधवांची संख्या ५० हजार ते एक लाखांच्या दरम्यान असू शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी सांगितले की, यंदा राज्यातील ५०० हून अधिक टूर ऑपरेटर्समार्फत मुस्लीम बांधव उमरासाठी सौदी अरेबिया येथे गेले आहेत. त्यामुळे सौदीमध्ये सध्या ५० हजारांपेक्षा अधिक महाराष्ट्रातील मुस्लीम उपस्थित असण्याची शक्यता आहे.

हज यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंची नोंद सरकारकडे अधिकृतपणे होते, मात्र उमरासाठी जाणाऱ्यांची कोणतीही केंद्रीकृत नोंदणी नसते. बहुतांश यात्रेकरू खासगी टूर अँड ट्रॅव्हल्स ऑपरेटर्सच्या माध्यमातून प्रवास करतात. त्यामुळे नेमका आकडा सांगणे कठीण होत असल्याचे आयोगाने स्पष्ट केले.
सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियात अडकलेल्या महाराष्ट्रातील मुस्लीम बांधवांची संख्या स्पष्ट करण्यासाठी सर्व टूर ऑपरेटर्सशी संपर्क साधण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सोमवारपर्यंत नेमकी संख्या स्पष्ट होईल, असे प्यारे खान यांनी सांगितले.

यासंदर्भात आयोग राज्य सरकारच्या संपर्कात असून, सर्वांना सुरक्षित परत आणण्यासाठी आवश्यक ती मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही संपर्क साधण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक गाव, शहर आणि जिल्ह्यातून उमरासाठी मुस्लीम बांधव जात असतात. त्यामुळे ही बाब राज्यभरातील हजारो कुटुंबांशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.