बारामतीत सुनील तटकरे यांनी दिवंगत अजितदादा पवार यांचे अभिवादन
पत्रकारांशी बोलताना तटकरे म्हणाले, देशाचे नेते अजितदादा यांना जावून एक महिना लोटला आहे. त्यांच्या स्मृतीस्थळी आज नतमस्तक होण्यासाठी आलो. दादांनी आम्हाला आयुष्यभर उर्जा दिली. लोकसेवा शिकवली. विकासाची दृष्टी, व्हीजन समोर ठेवले. माझ्यासोबत पार्थ व जय पवार हे ही होते.
अजितदादांच्या अपघातासंबंधी घातपाताच्या शक्यतेवर ते म्हणाले, विमान अपघात घडल्यानंतर त्याच्या चौकशीसाठी केंद्राच्या स्वतंत्र स्वायत्त तपास यंत्रणा असतात. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात आम्ही मुख्यमंत्र्यांकडे सीबीआय चौकशीची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ केंद्रीय गृह विभागाशी पत्र व्यवहार केला. त्यानुसार सीबीआय चौकशी सुरु आहे.
वेगवेगळ्या व्यक्तिंनी या घटनेबद्दल काही प्रश्न निर्माण केले आहेत. त्यांच्या बाबी लक्षात घेवून तपास व्हावा अशी राष्ट्रवादीचा अध्यक्ष म्हणून माझी भूमिका आहे. दादांच्या निधनाचे दुःख देशातील जनतेला आहे. हळहळ वाटते आहे. त्यामुळे चौकशीचा अहवाल जनतेसमोर यावा. जागतिक स्तरावरील संस्थांचीही तपास यंत्रणांनी मदत घ्यावी.
ज्या पद्धतीने तपास सुरु आहे त्यातून न्याय मिळेल का असा सवाल आमदार रोहित पवार यांनी केला होता. त्यावर तटकरे म्हणाले, कोणाला काय वाटते यावर मी भाष्य करणार नाही. अपघातानंतर प्रफुल्ल पटेल, तटकरे हे सर्वाधिक टार्गेट होत असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, राज्याच्या राजकारणात मी १९९१ पासून आहे. १९९९ पासून मी राष्ट्रवादीत कार्यरत आहे. मी अजितदादांच्या प्रत्येक गोष्टीचा साक्षीदार आहे. त्यांनी मला विविध पदांवर संधी दिली. लोकसभा लढवा असे साांगितले. त्यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांना विधीमंडळ पक्ष प्रमुख, उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेतली.
पटेल हे दीर्घकाळ पक्षाचे कार्याध्यक्ष राहिले आहेत. त्यामुळे कोणी टीकाटीपण्ण केली तर करू द्या. सुनेत्रा पवार यांनी धिरोदत्तपणे या स्थितीत जबाबदारी घेतली आहे. पार्थ व जय पवार यांनी सहमती दिली आहे. यासंबंधी कोण काय आरोप करतो ते करू द्या. आम्ही निर्णय घेतल्यावर किंवा त्याच्या आधी कोण काय करत होते हे माहिती आहे. अजितदादावंवर जहरी टिका कोणी केली. बारामतीतीच अजितदादा हे मी एकटा पडलो असल्याचे म्हणाले होते. २०१९ ला भाजपला तिकिट मागायला कोण कुठे गेले होते हे माझ्यासह दादांनाही माहिती होते.