राज्याची कृषी क्षेत्रात पीछेहाट; उद्योग, बांधकाम, सेवा क्षेत्रांचे राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळ; विकास दर ७.९ टक्के

राज्याची कृषी क्षेत्रात पीछेहाट; उद्योग, बांधकाम, सेवा क्षेत्रांचे राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळ; विकास दर ७.९ टक्के

 

मुंबई : गेल्या वर्षी चांगला पाऊस होऊनही कृषी व संलग्न क्षेत्रात आधीच्या वर्षाच्या तुलनेत जवळपास पाच टक्क्यांची पीछेहाट झाली आहे. उद्योग, बांधकाम आणि सेवा क्षेत्राने राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळ दिल्याने विकास दर चालू आर्थिक वर्षात ७.९ टक्के राहील व राष्ट्रीय विकास दरापेक्षा तो अधिक असल्याचा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.

राज्याची आर्थिक स्थिती उत्तम असून, सर्व क्षेत्रांमध्ये चांगली प्रगती होत असल्याचे चित्र विधिमंडळाला सादर करण्यात आलेल्या आर्थिक पाहणी अहवालातून उभे करण्यात आले आहे. चालू आर्थिक वर्षात (२०२५-२६) देशाचा विकास दर हा ७.४ टक्के अपेक्षित आहे. महाराष्ट्राचा विकास दर हा ७.९ टक्के असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कृषी व संलग्न क्षेत्राचा विकास दर हा ३.४ टक्के, सेवा क्षेत्र ९ टक्के तर उद्योगाचा विकास दर ५.७ टक्के असेल, असा अंदाज आहे.

पाऊस चांगला तरीही…

गेल्या वर्षी सरासरीच्या १०९ टक्के एवढा चांगला पाऊस राज्यात झाला होता. पण कृषी व संलग्न क्षेत्रात विकास दर ३.४ टक्के एवढाच असेल, अशी शक्यता आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात कृषी क्षेत्रात विकास दर हा सुधारित अर्थसंकल्पानुसार ९.१ टक्के होता. या तुलनेत कृषी क्षेत्राच्या विकास दरात ५.४ टक्के घसरण झाली आहे. चांगला पाऊस झाला तरीही पिकांचे झालेले नुकसान, अवेळी पावसाने शेतीला बसलेला फटका यातून कृषी क्षेत्राला फटका बसल्याचे निरीक्षण अहवालात नोंदविण्यात आले आहे.

उद्योग, बांधकाम क्षेत्रांमध्ये प्रगती

उद्योग क्षेत्रात २०२४-२५ मध्ये विकास दर ४.३ टक्के होता. यंदा हा दर ५.७ टक्के होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. बांधकाम क्षेत्रात विकासाचा दर यंदा ७.८ टक्के आहे. गेल्या वर्षी हाच दर ६.३ टक्के होता. स्थावर मालमत्ता क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर प्रगती झाली आहे. मोठ्या तसेच निमशहरांमध्ये सुरू असलेल्या बांधकामांमुळे या क्षेत्रात झळाळी प्राप्त झाली आहे. मुंबई, ठाण्यासह सर्वच मोठ्या शहरांमध्ये पुनर्विकासाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. बांधकाम क्षेत्राने राज्याच्या विकास दराला बळ दिले आहे.

निर्मिती वा उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्रांमध्ये गतवर्षाच्या तुलनेत यंदा वाढ अपेक्षित धरण्यात आली आहे. गेल्या वर्षी या क्षेत्रात विकास दर हा ४.१ टक्के होता. हा दर यंदा ५.९ टक्के होण्याचा अंदाज आहे. राष्ट्रीय पातळीवर या क्षेत्रात विकासाचा दर सात टक्के असताना महाराष्ट्रात या क्षेत्रात काहीसा मागे आहे. सेवा क्षेत्रात विकास दर हा ९ टक्के गृहीत धरण्यात आला आहे. गेल्या वर्षी ८.३ टक्के होता. वित्तीय सेवा, स्थावर मालमत्ता क्षेत्रांमध्ये चांगली वाढ दिसते. २०११-१२ ते २०२४-२५ या कालावधीत उद्योग क्षेत्राने राज्याला अर्थव्यवस्थेला चांगला हात दिला. विकासात सेवा क्षेत्राचा वाटा हा ५० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे.

ठळक वैशिष्ट्ये :

– सिंचनाची टक्केवारीची आकडेवारी देण्याचे पुन्हा टाळले

– कर्जाचा बोजा ९ लाख ३२ हजार कोटी

– व्याज फेडण्यासाठी ६५ हजार कोटी

– १ लाख २९ हजार कोटींची विविध कर्जाला थकहमी – विदेशी गुंतवणुकीत देशात महाराष्ट्राचा वाटा ३१ टक्के