जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; राष्ट्रपतींचे अनेक राज्यांबाबत मोठे आदेश, पाहा संपूर्ण यादी

जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; राष्ट्रपतींचे अनेक राज्यांबाबत मोठे आदेश, पाहा संपूर्ण यादी

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरूवारी रात्री अनेक राज्यांच्या राज्यपाल बदलीचे आदेश दिले. तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर हिमाचल प्रदेशचे राज्यपाल शिवप्रताप शुक्ला यांना तेलंगणाचे राज्यपाल म्हणून नियुक्त केले आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी काल सायंकाळी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रात्री उशीरा अनेक राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले आहेत.

कोण आहेत जिष्णू देव वर्मा?

त्रिपुराच्या राजघराण्यात जन्मलेले जिष्णू देव वर्मा हे ईशान्य भारतातील अनुभवी राजकारणी म्हणून ओळखले जातात. २०१८ ते २०२३ या काळात त्यांनी त्रिपुराचे उपमुख्यमंत्री म्हणून काम केले होते. तसेच वित्त, ऊर्जा आणि ग्रामीण विकास सारख्या महत्त्वाच्या खात्यांचीही जबाबदारी सांभाळली होती.

१५ ऑगस्ट १९५७ रोजी त्रिपुराची राजधानी अगरतळा येथे त्यांचा जन्म झाला. १९९० च्या दशकात त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. डाव्यांचे वर्चस्व असलेल्या त्रिपुरात वर्मा यांनी भाजपाची संघटना उभी करण्याचे काम केले. १९९६, १९९८ आणि १९९९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी त्रिपुरा पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवली.

२०१८ साली त्रिपुरामध्ये भाजपाची सत्ता आल्यानंतर जिष्णू देव वर्मा यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले. राजकारणातील त्यांच्या दीर्घ अनुभवानंतर काही काळापूर्वी त्यांच्याकडे तेलंगणाच्या राज्यपालपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर आता ते महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून आले आहेत.

कोणकोणत्या राज्यांचे राज्यपाल बदलले?

  • दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांची लडाखचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती.
  • तरनजित सिंग संधू यांची दिल्लीचे नायब राज्यपालपदी म्हणून नियुक्ती.
  • हिमाचल प्रदेशचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ला यांची तेलंगणाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती.
  • तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती.
  • नंद किशोर यादव यांची नागालँडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती.
  • लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सय्यद अता हसनैन यांची बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्ती.
  • तामिळनाडूचे राज्यपाल आर.एन. रवी आता पश्चिम बंगालचे राज्यपाल
  • केरळचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर हे आता तामिळनाडूच्या राज्यपालपदाची जबाबदारी पार पाडणार.
  • लडाखचे नायब राज्यपाल कविंदर गुप्ता हे आता हिमाचल प्रदेशचे राज्यपाल असतील

मावळते राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या नियुक्तीबाबत प्रश्न

माजी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदी नियुक्ती झाल्यानंतर सप्टेंबर २०२५ मध्ये आचार्य देवव्रत यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली होती. मात्र अवघ्या सहा महिन्यातच आता राज्यपाल बदलले गेले आहेत. आचार्य देवव्रत यांच्याकडे अद्याप कोणती नवी जबाबदारी देण्यात आली आहे? याची माहिती समोर आलेली नाही.