“आज अजित पवार असते तर…”, खरातच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवरून रूपाली ठोंबरेंचा संताप; रूपाली चाकणकर यांच्याबद्दल म्हणाल्या….
नाशिकमधील तथाकथित भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात याच्या अटकेनंतर आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी थेट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे. रूपाली ठोंबरे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन चाकणकर यांच्यावर अनेक आरोप केले. तसेच या प्रकरणाविषयी धक्कादायक दावे केले.
नाशिकमधील कथित भोंदू बाबा खरातच्या विरोधात बातमी प्रसिद्ध करणाऱ्या एका दैनिकाला राज्य महिला आयोगाने नोटीस पाठवून खुलासा मागितला होता. या प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. बाबाविषयी बातमी दिल्यानंतर आयोगाने खुलासा मागण्याचे काय कारण आहे? उलट त्या बातमीची दखल घेऊन तिथे काही गैरप्रकार घडत आहे का? याची चौकशी करणे गरजेचे होते. २०२५ सालीच जर ती चौकशी झाली असती तर इतक्या महिला अत्याचाराला बळी पडल्या नसत्या. याचाच अर्थ खरात या भोंदू बाबाने राज्य महिला आयोगाच्या पदाचा वापर करून महिलांवर अत्याचार केला आहे.
राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद हे संवैधानिक असून या पदावरून राज्यातील महिलांची सुरक्षितता जपणे, त्यांना न्याय देण्याचे काम करणे अपेक्षित असताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांनी उलट काम केले. जे महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी आहे, त्यांनाच वाचविण्यासाठी महिला आयोग आटापिटा करत आहे. त्यांच्याबाजूनेच खुलासा मागितला जात आहे, हा पदाचा गैरवापर नाही का? असा सवाल रूपाली ठोंबरे पाटील यांनी उपस्थित केला.