बारामती नगरपालिकेच्या शाळांना नगरसेवकांची अचानक भेट; आढळल्या मोठ्या त्रुटी
बारामती: बारामती नगरपालिकेच्या शाळांमधील शिक्षणाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, काही नगरसेवकांनी अचानक भेट देत शाळेची पाहणी केली असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. विद्यार्थ्यांचे शिक्षण, स्वच्छता आणि प्रशासन या तिन्ही बाबतीत मोठ्या त्रुटी आढळून आल्याने नगरपालिकेच्या शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नगरसेवक आरती शेडगे, सविता जाधव, शर्मिला ढवाण, मंगल कीर्वे, संपदा चौधर, सोमनाथ गजाकस, धनश्री बांदल, विशाल हिंगणे, निलेश इंगुले आणि गोरख पारसे यांनी बारामती नगरपालिकेच्या चार नंबर तसेच आठ नंबर शाळेला अचानक भेट देत परिस्थितीची पाहणी केली.
या भेटीदरम्यान शाळेतील शिक्षणाचा दर्जा अत्यंत ढासळलेला असल्याचे नगरसेवकांच्या निदर्शनास आले. काही वर्गांमध्ये विद्यार्थ्यांची योग्य विभागणी न करता वेगवेगळ्या इयत्तांचे विद्यार्थी एकत्र बसवले असल्याचे दिसून आले.
पाहणीदरम्यान काही शिक्षक शाळेत अनुपस्थित असल्याचेही आढळून आले. तसेच शाळेच्या परिसरात अस्वच्छता असल्याचे चित्र दिसून आले. वर्गखोल्या व परिसराची देखभाल योग्य प्रकारे होत नसल्याची बाब नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिली.
या सर्व प्रकारामुळे नगरपालिकेच्या शिक्षण विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.