“आता हा देश चालवणं मोदींच्या आवाक्यातली गोष्ट नाही” : राहुल गांधीं

“आता हा देश चालवणं मोदींच्या आवाक्यातली गोष्ट नाही” : राहुल गांधीं

 

नवी दिल्ली: रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनावर सध्या देशाच्या राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत. एकीकडे सत्ताधाऱ्यांकडून या आवाहनाची पाठराखण केली जात असताना दुसरीकडे विरोधकांनी त्यावर टीकेची झोड उठवली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदींच्या आवाहनाला लक्ष्य करतानाच मोदींना दबावापुढे तडजोड केल्याची टीका केली. राहुल गांधींनी सोमवारी सकाळी त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर यासंदर्भात पोस्ट शेअर केली असून त्यामध्ये आपली सविस्तर भूमिका मांडली आहे. मोदींच्या आवाहनानंतर खरंच देशात इंधन पुरवठ्याची नेमकी काय स्थिती आहे? याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

आखातात चालू असलेल्या युद्धाचा फटका भारताला बसू द्यायचा नसेल तर नागरिकांनी पेट्रोलियम उत्पादनांचा कमी वापर करावा, विदेशी वस्तू टाळून जास्तीत जास्त स्वदेशी वस्तूंचा वापर करावा, सोन्याची खरेदी कमी करावी असं मोदी म्हणाले आहेत. यामुळे या वस्तू विदेशातून आयात करण्यासाठी खर्च कराव्या लागणाऱ्या परकीय चलनाची मोठी बचत होईल, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. रविवारी हैदराबादमध्ये झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात मोदी सहभागी झाले होते. यावेळी देशातील ऊर्जा क्षेत्रावर भाष्य करताना त्यांनी देशवासीयांना इंधन बचतीचं आवाहन केलं आहे.

मोदींच्या आवाहनात ७ मुद्यांचा समावेश

१. शक्य तिथे वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या
२. वर्षभरासाठी सोने खरेदी टाळा
३. सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करून पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा
४. स्वयंपाक बनवण्याच्या तेलाचा वापर कमी करा
५. रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे वळा
६. स्वदेशीचा अधिकाधिक वापर करा, विदेशी उत्पादनं टाळा
७. वर्षभरासाठी विदेशी प्रवास टाळा

या गोष्टी केल्यास त्यांवर खर्च होणाऱ्या विदेशी चलनाची बचत होईल आणि भारतावर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा कमीत कमी परिणाम होईल, असा तर्क मोदींनी यावर मांडला. यासंदर्भात मोदींनी केलेलं आवाहन संयुक्तिक असल्याचं म्हणत आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांनी त्यांचं समर्थन केलं आहे. “सोन्याचा, तेलाचा व्यवहार प्रामुख्याने डॉलर्समध्ये केला जातो. जर आशियातली परिस्थिती चिघळली, तर आपल्याला महागातलं तेल डॉलर्समध्ये खरेदी करावं लागणार आहे. त्यामुळे सघ्याची परिस्थिती डॉलर्सची बचत करण्याची आहे”, असं ते म्हणाले.

राहुल गांधी नरेंद्र मोदींबाबत काय म्हणाले?

दरम्यान, राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनावर टीका करताना हे सरकारचं अपयश असल्याचं नमूद केलं आहे.

“मोदीजींनी काल जनतेकडून त्याग करण्याची मागणी केली. सोनं खरेदी करू नका, विदेशात जाऊ नका, पेट्रोल कमी वापरा, खाद्यतेल कमी वापरा, मेट्रोने प्रवास करा, घरून काम करा. हे उपदेश नाहीत, त्यांच्या अपयशाचे पुरावे आहेत. १२ वर्षांत त्यांनी या देशाला अशा टप्प्यावर आणून ठेवलंय की त्यांना जनतेला सांगावं लागतंय काय खरेदी करा, काय करू नका, कुठे जा, कुठे जाऊ नका. प्रत्येकवेळी स्वत:चा बचाव करण्यासाठी सगळी जबाबदारी जनतेवर टाकून मोकळे होतात. हा देश चालवणं आता तडजोड केलेल्या पंतप्रधानांच्या आवाक्यातली गोष्ट राहिलेली नाही”, असं राहुल गांधींनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.