येत्या शैक्षणिक वर्षात कोणत्या इयत्तांची पाठ्यपुस्तके बदलणार? बालभारतीने दिली महत्त्वाची माहिती…
पुणे : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळातर्फे (बालभारती) उपलब्ध करून दिली जाणारी पाठ्यपुस्तकांपैकी काही इयत्तांची पाठ्यपुस्तके शैक्षणिक वर्ष २०२६-२७मध्ये बदलणार आहेत. त्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावी या इयत्तांना नवीन पाठ्यपुस्तके लागू होणार असून, इयत्ता पाचवी, सातवी, नववी आणि अकरावी या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांचे शेवटचे वर्ष असणार आहे.
बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक यांनी याबाबतची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात जून २०२६ मध्ये इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी, आणि सहावीची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित होणार आहेत. त्यामुळे पालकांनी नवीन अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके खरेदी करावीत. तर शैक्षणिक वर्ष २०२६-२७ हे इयत्ता पाचवी, सातवी, नववी आणि अकरावी या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांचे शेवटचे वर्ष असणार आहे. त्यामुळे या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांची खरेदी आवश्यकतेनुसार करावी, अशा सूचना बालभारतीतर्फे संबंधितांना करण्यात आल्या आहेत. इयत्ता दुसरी, तिसरी,चौथी व सहावीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमासाठी ‘शिकू मराठी आनंदे’ तसेच हिंदी, उर्दू ,गुजराती, कन्नड, सिंधू, तेलगू, तमिळ आणि बंगाली या इतर माध्यमांसाठी ‘करू मैत्री मराठीशी’ ही मराठी भाषेची अनिवार्य पुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
इयत्ता सहावीसाठी हिंदी सुलभभारती, हिंदी सुगमभारती, तसेच सुगमभारती (कन्नड संयुक्त) तारुफे उर्दू, सिंधू भारती, तेलुगु सरल भारती, गुजराती साहित्य परिचय ही पुनर्मुद्रण (जुन्या अभ्यासक्रमाची) वैकल्पिक पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इयत्ता पाचवी, सातवी व इयत्ता आठवीच्या एकात्मिक आणि नियमित पाठ्यपुस्तकांमधील आशय मूल्यमापन योजना समान आहे. तसेच ही दोन्ही प्रकारची पाठ्यपुस्तके प्रचलित अभ्यासक्रमावर आधारित आहेत. ही पाठ्यपुस्तके भांडारात शिल्लक असून विक्रीसाठी उपलब्ध आहेत, अशी माहिती ओक यांनी दिली.
बालभारतीच्याच प्रात्यक्षिक नोंदवहीचा वापर बंधनकारक
इयत्ता नववी ते बारावीसाठी विषय योजना व मूल्यमापन योजनेनुसार विद्यार्थ्यांनी या इयत्तांसाठी बालभारतीने तयार केलेल्या प्रात्यक्षिक नोंदवहीचा वापर करणे बंधनकारक राहील. कोणत्याही शैक्षणिक संस्थेने खाजगी प्रकाशकांच्या प्रात्यक्षिक नोंदवहीचा वापर करण्याचे बंधन किंवा शक्ती विद्यार्थ्यांवर करू नये, असे अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले.
आठवी ते बारावीसाठी स्वाध्यायपुस्तिकांची निर्मिती
बालभारतीतर्फे राज्यातील शिक्षण तज्ज्ञ, अनुभवी शिक्षकांनी मराठी आणि इंग्रजी माध्यमातील इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांच्या वैशिष्ट्यपूर्ण व दर्जेदार स्वाध्याय पुस्तिकांची निर्मिती केलेली आहे. या स्वाध्याय पुस्तिकांच्या दर्शनी किमतीवर ४० टक्के सूट देण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या स्वाध्याय पुस्तिकांचा वापर करण्याचे आवाहन अनुराधा ओक यांनी केले.