बारामतीत आंतरराज्य गांजा तस्करीचा पर्दाफाश..तीन कोटींचा गांजा आणि वाहनांसह टोळी जेरबंद

बारामतीत आंतरराज्य गांजा तस्करीचा पर्दाफाश..तीन कोटींचा गांजा आणि वाहनांसह टोळी जेरबंद

 


बारामती : पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा व बारामती शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत आंतरराज्य गांजा तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल ६३४ किलो गांजा, दोन चारचाकी वाहने व इतर साहित्य असा सुमारे तीन कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती शहर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान जळोची परिसरात मोठ्या प्रमाणात गांजा साठवून ठेवल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा व बारामती शहर पोलिसांनी समांतर तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला गेला.

या प्रकरणातील आरोपींमध्ये प्रकाश उर्फ पक्या मोहन काटे (रा. कल्याणीनगर, तांदुळवाडी), समाधान धर्मराज गायकवाड (रा. सांगवी, ता. बारामती), प्रिन्सकुमार मुन्ना सिंह (रा. बिहार), राहुल कल्याण गोरे, विकी उर्फ पप्पू कांबळे, संग्राम उर्फ चंदन सिंह तसेच जॉकी माझी यांचा समावेश आहे. आरोपी छत्तीसगडमधून गांजा आणून पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत विक्री करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

त्यानंतर मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी पाठलाग करुन एका इनोव्हातून १३४ किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी विकी उर्फ पप्पू विजय कांबळे (रा. भीमनगर, जळोची, बारामती) यास अटक करण्यात आली. दुस-या एका वाहनाच्या पाठलागात फलटण रस्त्यावर पोलिसांनी इनोव्हा मधून २३ किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी हुसेन सुखदेव लष्करे, आदित्य विकास शिंदे, युवराज ज्ञानेश्वर दुर्गे (सर्व. रा. कोथरुड, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.

तपासादरम्यान पोलिसांनी विविध ठिकाणी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडून ४७८ किलो गांज्यानंतर आणखी १३४ व २३ किलो गांजा जप्त करण्यात आला. या कारवाईत बारामती, सांगली तसेच इतर भागांत पोलिसांनी समन्वय साधत धाडसत्र राबविले.

या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार व उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी, सहाय्यक पोलिस निरीक्षक कुलदीप संकपाळ, बाळासाहेब कारंडे, अभिजीत एकशिंगे, ज्ञानेश्वर क्षिरसागर, स्वप्निल अहीवळे, निलेश शिंदे, अजय घुले,रत्नदिप भंडारे, रामचंद्र शिंदे, सुलतान डांगे, अमोल शिंदे, उत्तम खाडे, यशवंत पवार, गिरीश नेवसे, अमोल देवकाते, अक्षय सिताप, विशाले शिंदे, सागर जामदार, बनसोडे, झणझणे, यांनी केली.