दिल्लीत लँडिंगपूर्वीच एअर इंडियाच्या विमानात आग; १६० प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला!
एअर इंडियाने या संदर्भात अधिकृत निवेदन जारी करून माहिती दिली आहे की, विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स पूर्णपणे सुखरूप असून कोणालाही दुखापत झालेली नाही.
लँडिंगच्या ऐन मोक्यावर कॉकपिटमध्ये वाजला धोक्याचा अलार्म!
मिळालेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे 'AI 2802' हे ए३२० विमान गुरुवारी संध्याकाळी बंगळुरूहून दिल्लीच्या दिशेने झेपावले होते. विमान दिल्लीच्या हवाई हद्दीत आले आणि विमानतळावर उतरण्याच्या तयारीत होते, त्याच वेळी विमानातील कॉकपिटमध्ये वैमानिकांना एका इंजिनमधून आग लागत असल्याचे संकेत देणारा धोक्याचा अलार्म मिळाला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानात १६० पेक्षा जास्त प्रवासी सवार होते. हवेतच इंजिनमध्ये आग लागल्याचे समजताच पायलटने एक क्षणही न गमावता तात्काळ दिल्ली येथील एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधला आणि विमानाला तातडीने उतरवण्याची परवानगी मागितली. विमानतळावरही तात्काळ आपत्कालीन यंत्रणा सज्ज करण्यात आली होती.
प्रवासी सुखरूप बाहेर!
एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, "चालक दलाने सर्व मानक संचालन प्रक्रियांचे तंतोतंत पालन केले. वैमानिकांनी विमानावर नियंत्रण राखत ते दिल्ली विमानतळावर सुरक्षितपणे उतरवले. विमान धावपट्टीवर यशस्वीरित्या उतरल्यानंतर सर्व प्रवाशांना आणि क्रू सदस्यांना अत्यंत सावधगिरीने आणि सुरक्षितपणे विमानातून बाहेर काढण्यात आले."
प्रकरणाच्या चौकशीचे आदेश
हा प्रकार नेमका कशामुळे घडला, याची तपासणी आता सुरू करण्यात आली आहे. एअर इंडियाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले की, कंपनी या घटनेच्या कारणांचा सखोल तपास तातडीने सुरू करत आहे. नागरी विमानचालन क्षेत्रातील संबंधित वरिष्ठ यंत्रणा आणि विमान वाहतूक अधिकाऱ्यांच्या मदतीने या संपूर्ण तांत्रिक बिघाडाची पडताळणी केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा केवळ एक तांत्रिक बिघाड असण्याची शक्यता वर्तवली जात आहे, मात्र इंजिनमध्ये खरोखरच आग लागली होती की ती केवळ तांत्रिक त्रुटी होती, हे सविस्तर तपास पूर्ण झाल्यानंतरच समोर येईल.