“मुंडे आणि पटेलांनी अजित पवारांचं डोकं फिरवलं होतं”, राष्ट्रवादीतील संघर्षाबाबत संजय राऊतांचा मोठा दावा

“मुंडे आणि पटेलांनी अजित पवारांचं डोकं फिरवलं होतं”, राष्ट्रवादीतील संघर्षाबाबत संजय राऊतांचा मोठा दावा

 

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय भविष्याची चिंता निर्माण झाली आहे. महापालिकांच्या निवडणुकांनंतर हे दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा होती. मात्र, अजित पवारांच्या निधनानंतर ही चर्चा गुंडाळण्यात आली. आता पुन्हा एकदा या चर्चेला जोर आला आहे. परिणामी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांचे पक्षांतर्गत असलेले वाद आता चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. यावरून शिवसेना (ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर टीका केली. आज त्यांनी खूप दिवसांनी माध्यमांशी संवाद साधला.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षातील अंतर्गत वादाबाबत संजय राऊतांना विचारलं असता ते म्हणाले, ” अजित पवारांचा राष्ट्रवादी किंवा शिंदेंची शिवसेना हे पक्ष नाहीयत. अजित पवार असतानाही हा कधीच पक्ष नव्हता. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून हे तयार झालेले गट आहेत. मूळ पक्ष हा शरद पवारांचा आणि उद्धव ठाकरेंचा आहे. आता त्यावर ३० जुलैला सुनावणी आहे. बाकी अजित पवार वगैरे पक्ष नाहीयत. ते गट होते. लोक फुटले, दबावाखाली बाजूला गेले.”

अजित पवारांचं डोकं फिरवण्यात धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेलांसारखी लोक होते

“पक्षांना विचारधारा आणि भूमिका असते. या दोन पक्षाकडे आहे का? शिंदेची विचारधारा बाळासाहेब ठाकरे आणि अजित पवारांच्या पक्षाची विचारधारा शरद पवारांच्या पक्षासारखी आहे”, असंही ते म्हणाले.

दरम्यान प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे पार्थ पवार यांच्यावर नाराज असून त्यांची तक्रार शरद पवारांकडे करण्यात आली असल्याची चर्चा आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले, “मला माहीत नाही. ही त्यांच्या कर्माची फळं आहेत. शरद पवारांचंही हे म्हणणं होतं की अजित पवारांचं डोकं फिरवण्यात जे काही प्रमुख लोक होते, त्यात धनंजय मुंडे, प्रफुल पटेलसारखी लोक होते. ही त्यांच्या कर्माची फळं आहेत.”

भाजपाला सुखाची आणि अय्याशीची चटक लागली

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनावरही टीका केली. ते म्हणाले, “भाजपाला सुखाची आणि अय्याशीची चटक लागली आहे. त्यांना ढोंग करण्याची सवय लागली आहे. या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या आर्थिक नाड्या भाजपाच्या हातात आहेत. त्यामुळे जनता गरीब आहे. ही चिंता त्यांनी नेदरलँडमधून व्यक्त केली. इथे या ना, इथल्या देशाची संस्कृती रसातळाला चालली आहे. नेदरलँडचं पाहायला त्यांचं राष्ट्र समर्थ आहे.”