'अजितदादांच्या अपघाताला ४ महिने झाले, तुम्ही दिलेला शब्द कुठे गेला?'; रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
"अजितदादांच्या अपघाताला उद्या ४ महिने होतील. अधिवेशनात बोलताना तुम्ही गुन्हेगारांना पाताळातून शोधून काढण्याचा, सीबीआय चौकशीबाबत अमित शहा यांच्याकडे पाठपुरावा करण्याचा, तसेच कर्नाटकात नोंद झालेली झिरो एफआयआर महाराष्ट्रात वर्ग करून घेण्याचा शब्द दिला होता. आपण शब्द देऊन अडीच महिने होत आले, या अडीच महिन्यात काय कार्यवाही झाली हे आपणच सांगावे, असेही रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
रोहित पवार म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत गेल्या अडीच महिन्यात आपल्या असंख्य बैठका झाल्या असतील, त्यामध्ये सीबीआय चौकशीचा मुद्दा आपण घेतला नसेल, तर आज होणाऱ्या बैठकीत तरी हा मुद्दा आग्रहाने घ्या. राष्ट्रवादीचे मंत्री उपस्थित असतील तर त्यांनी देखील पाठपुरावा करायला हवा."
'राजकीय लोकांसाठी मैत्रीची भावना वेगळी असते का?
"मित्र हयात असला किंवा नसला तरी मित्रासाठी मैत्री नेहमीच जिवंत असते, ही सर्वसामान्य जनतेची भावना असते. राजकीय लोकांसाठी ही भावना वेगळी आहे का? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही," असा टोला रोहित पवार यांनी लगावला.
"राहिला प्रश्न सीआयडी चौकशीचा, तर सीआयडी काय करते नेमकं हेच कळत नाही. गेल्या २८ तारखेला सीआयडी कार्यालयात गेलो असता तपास अधिकारीच उपस्थित नव्हते. त्यांना मेल करून अनेक नवे पुरावे दिले, पत्र स्वतः जाऊन दिले, तरी त्यांचा काहीही प्रतिसाद नाही. अजितदादांच्या अपघात प्रकरणात सीआयडी करत असलेला तपास बघता, सीआयडीसारख्या कुचकामी यंत्रणा म्हणजे बिनकामाचे ओझेच म्हणावे लागेल," अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
तसेच, आपण उद्या (गुरुवारी) सकाळी १०.३० वाजता पुन्हा सीआयडी कार्यालयाला भेट देणार असल्याचे सांगत पवार यांनी इशारा दिला. "सीआयडी ऑफिसला कदाचित सनदशीर मार्गाची भाषा समजत नसेल, तर वेगळ्या भाषेत सांगावे लागेल," असे म्हणत रोहित पवारांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.