मोठा राजकीय भूकंप?, दिल्लीत हालचालींना वेग; काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य, भाजपा अध्यक्ष कर्नाटकात
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन पहिल्यांदाच कर्नाटक दौऱ्यावर जात आहेत. त्यांच्या या दौऱ्याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. ते भाजपाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री यांची भेट घेणार आहेत. त्यातून भाजपाचं मिशन कर्नाटक एक्टिव्ह झाल्याचं बोलले जात आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आपला निम्मा कार्यकाळ पूर्ण केला आहे. त्यांच्या राजीनाम्याची आणि डी. के. शिवकुमार यांच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्तीची चर्चा काँग्रेस नेतृत्वासाठी बऱ्याच काळापासून चिंतेचा विषय ठरली आहे. कर्नाटकात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत कलहानंतर भाजपा अधिकच सक्रिय झाली आहे. कर्नाटक हे विशेष महत्त्वाचे आहे कारण ते काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे गृहराज्य आहे. खर्गे यांचा मुलगा राज्य सरकारमध्ये मंत्री आहे.
दरम्यान, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी कर्नाटकच्या आपल्या पहिल्या दौऱ्यात कोणतेही मोठे जाहीर स्वागत समारंभ किंवा रोड शो न घेण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या जबाबदार वापरासाठी केलेल्या आवाहनानुसार भाजपाने राज्य युनिटला कार्यक्रम साधा ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. कर्नाटकमध्ये पुढील निवडणुका २०२८ मध्ये होणार आहेत. याठिकाणी विधानसभेत काँग्रेसला भक्कम बहुमत आहे, परंतु CM पदावरून काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलह वाढल्यास कर्नाटकात काहीही घडू शकते हे कर्नाटकच्या राजकारणाने भूतकाळात हे पाहिले आहे. कर्नाटकात रिसॉर्ट पॉलिटिक्स ही एक सामान्य बाब आहे.