भारतीय डॉक्टरचा चमत्कार! चीनमधून ३००० किमी दूर हैदराबादमध्ये असलेल्या रुग्णावर केली यशस्वी शस्त्रक्रिया
मिळालेल्या माहितीनुसार, ही एक मूत्रवाहिनी पुनर्प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होती, यामध्ये मूत्रवाहिनी मूत्राशयाला पुन्हा जोडण्यात आली. ही शस्त्रक्रिया चीनमध्ये विकसित केलेल्या रोबोटिक तंत्रज्ञान आणि हाय-स्पीड 5G इंटरनेटचा वापर करून करण्यात आली. संपूर्ण शस्त्रक्रिया अंदाजे ९० मिनिटे चालली. या काळात, वुहानमधील टोंगजी रुग्णालय आणि हैदराबाद रुग्णालयातील वैद्यकीय पथकांमध्ये सतत समन्वय होता.
भारतातील चिनी दूतावासाच्या प्रवक्त्या यू जिंग यांनीही 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही माहिती शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, वुहानमध्ये बसून भारतीय मूत्ररोगतज्ञ डॉ. सय्यद मोहम्मद घौस यांनी हैदराबादच्या एका रुग्णावर अवघ्या ९० मिनिटांत रोबोटच्या साहाय्याने शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली.
शस्त्रक्रिया सुरू होण्यापूर्वी, वुहान आणि हैदराबाद येथील डॉक्टरांनी एकत्रितपणे रुग्णाच्या वैद्यकीय अहवालांचे ऑनलाइन अभ्यास केला. यानंतर, रोबोटिक हातांच्या हालचालींसाठी एक प्लान तयार केला. हैदराबादमधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी रुग्णाला भूल दिली आणि शस्त्रक्रिया कक्षात रोबोटिक प्रणाली सुरू केली.
ही रोबोटिक सिस्टीम अत्याधुनिक शस्त्रक्रिया उपकरणे आणि हाय-डेफिनिशन 3D कॅमेऱ्यांनी सुसज्ज होती, हे हैदराबादहून वुहानला थेट प्रतिमा प्रसारित करत होते. डॉ. घौस वुहानमधील टोंगजी रुग्णालयात एका नियंत्रण कन्सोलवर बसून संपूर्ण शस्त्रक्रियेदरम्यान रोबोटिक हातांना नियंत्रित करत होते.
रोबोटला दर सेकंदाला सूचना देत होते
मिळालेल्या माहितीनुसार, 5G नेटवर्कच्या मदतीने डॉक्टरांच्या सूचना फक्त २०० मिलिसेकंदात, म्हणजेच ०.२ सेकंदात हैदराबादला पोहोचत होत्या. यामुळे हजारो किलोमीटर दूर असूनही शस्त्रक्रियेदरम्यान अचूकता आणि नियंत्रण राखणे शक्य झाले.
हैदराबादमधील डॉक्टरांचे पथकही पूर्ण वेळ ऑपरेशन थिएटरमध्येच होते. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी त्यांची टीम सज्ज होती.