बारामतीत बेकायदेशीर बॉडी बिल्डिंग इंजेक्शन रॅकेटचा पर्दाफाश; युवक अटकेत
बारामती: शरीर क्षमता वाढविणे व बॉडी बिल्डिंगच्या नावाखाली तरुणांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या बेकायदेशीर इंजेक्शन विक्री रॅकेटवर बारामती शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांनी संयुक्त कारवाई करत मोठा प्रहार केला आहे. या कारवाईत “टर्मिन” नावाने ओळखले जाणारे MEPHENTERMINE SULPHATE INJECTION IP या Schedule-H प्रवर्गातील १०० सिलबंद इंजेक्शनसह एका आरोपीस अटक करण्यात आली असून ८३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. 203/2026 भारतीय न्याय संहिता कलम 123, 125, 278 तसेच औषध व सौंदर्य प्रसाधने अधिनियम 1940 चे कलम 18(C), 18(A)(VI), 27(D), 28 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक 23 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण येथील पथकास गोपनीय माहिती मिळाली होती की, बारामती शहर हद्दीतील एम.ई.सी.बी. कार्यालयाजवळील सर्व्हिस रोड परिसरात एक इसम संशयास्पदरीत्या इंजेक्शनचा साठा घेऊन फिरत आहे. माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ सापळा रचून संबंधित ठिकाणी धाड टाकली. या वेळी रोडच्या कडेला अॅक्टीव्हा स्कुटी (MH42AW/9260) वर बसलेला एक इसम संशयास्पद अवस्थेत आढळून आला. त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव गौरव बाळासो जाधव (वय 24, रा. पवार बंगला जवळ, आमराई, बारामती) असे सांगितले. पोलिसांनी त्याची व त्याच्या स्कुटीची झडती घेतली असता डिकीत ठेवलेल्या खाकी बॉक्समध्ये “टर्मिन” नावाने ओळखले जाणारे MEPHENTERMINE SULPHATE INJECTION IP चे १०० सिलबंद इंजेक्शन आढळून आले.
सदर इंजेक्शन हे “NAPROPHEN” कंपनीचे असून त्यावरील Batch No. 2CX26003, उत्पादन दिनांक मार्च-2026 व मुदत समाप्ती फेब्रुवारी-2029 अशी माहिती नमूद असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीकडे सदर इंजेक्शन खरेदीचे कोणतेही वैध बिल, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन अथवा परवाना आढळून आला नाही. प्राथमिक तपासात आरोपी जिम व बॉडी बिल्डिंग करणाऱ्या तरुणांना शारीरिक ताकद वाढविण्यासाठी प्रती इंजेक्शन सुमारे ५०० रुपयांना विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या कारवाईत ३३ हजार ४०० रुपये किमतीची १०० इंजेक्शन व ५० हजार रुपये किमतीची अॅक्टीव्हा स्कुटी असा एकूण ८३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
औषध निरीक्षक सचिन बुगड यांनी तपासादरम्यान सांगितले की, MEPHENTERMINE SULPHATE INJECTION IP हे Schedule-H प्रवर्गातील औषध असून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय त्याची विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. या औषधाचा मूळ वापर लो ब्लड प्रेशरच्या उपचारासाठी केला जातो. मात्र त्याचा गैरवापर शरीर क्षमता वाढविण्यासाठी होत असल्याचे समोर आले आहे. तसेच या इंजेक्शनचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास झोप येणे, मानसिक गोंधळ, भास होणे, आकडी येणे, हृदयाचे ठोके मंदावणे यांसारखे गंभीर दुष्परिणाम होऊन व्यक्तीच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सदर आरोपीस अटक करण्यात आली असून त्याच्याकडून इंजेक्शन पुरवठा साखळी, आर्थिक व्यवहार, संबंधित आरोपी, जिम नेटवर्क व बेकायदेशीर औषध विक्रीबाबत सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर तसेच बारामती शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक कारंडे, पोलीस हवालदार स्वप्नील अहिवळे, अजय घुले, निलेश शिंदे तसेच बारामती शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी सहभाग घेतला.