कोल्हापुरात तृतीयपंथीयांची ‘आपदा टीम’ सज्ज; जगातील पहिला उपक्रम

कोल्हापुरात तृतीयपंथीयांची ‘आपदा टीम’ सज्ज; जगातील पहिला उपक्रम

 


कोल्हापूर: महापूर, भूकंप अथवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती ओढावल्यास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडील आपदामित्र आणि आपदासखी जीव धोक्यात घालून बचाव कार्यासाठी झोकून देऊन काम करतात. आता त्यांच्या जोडीला समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाजूला असलेला तृतीयपंथी जोडले गेले आहेत. कोल्हापुरातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून या तृतीयपंथीयांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देऊन आपत्तीसाठी सज्ज ठेवण्यात आलं आहे. १० जणांची ही टीम आता कोणतीही आपत्ती ओढावल्यास बचाव कार्यासाठी एक पाऊल पुढे असणार आहे. हा असा उपक्रम जगातील पहिला असल्याचा दावा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी केला.


कोल्हापुरचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ प्रसाद संकपाळ यांच्या प्रयत्नातून आणि कोल्हापुरातील तृतीयपंथीयांच्या हक्क आणि अधिकारांसाठी काम करणाऱ्या मैत्री संघटनच्या प्रमुख मयुरी आळवेकर, शिवानी गजबर, झोया दिन्नी, सुलभा, वैशाली, मोगरा या तृतीयपंथीयांना मोटर बोट कशी चालवावी, पाण्यात बुडणाऱ्या माणसाला बाहेर कसे घ्यावे, तलाव, नदीत व्यक्तीला शुद्धीवर आणण्यासाठी प्रथम उपचार कसे द्यावेत, बोट तयार कशी करावी, तयार केलेली बोट परत डिफ्लेक्ट कशी करावी याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण कोल्हापुरातील राजाराम तलाव येथे देण्यात आलं.


जिल्हाधिकारी विजय राठोड काय म्हणाले?

"मान्सून पूर्व तयारीचा एक भाग म्हणून आपण स्वयंसेवकांना संकट काळात बचावकार्य कसं करायचं याचं प्रशिक्षण देत आहोत. कोल्हापूर जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक आहेत. यामध्ये सर्वांचा सहभाग आहे. त्याच दृष्टीने तृतीयपंथींच्या दहा जणांच्या टीमला आपण प्रथमच ट्रेनिंग देतोय. जवळपास चार ते पाच दिवस त्यांचं ट्रेनिंग होणार. जी काही आपत्ती येईल त्यामध्ये मदत कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग राहणार आहे. ही मला वाटतं प्रथमच टीम आहे. ज्याप्रकारे त्यांनी प्रशासनाला मदत केली आहे, पूर्ण समाजाच्या कोणत्याही आपत्तीच्या परिस्थितीत मदत करण्याचा निर्णय त्यांनी ठाम केला आहे", अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

"हा निर्णय घेण्याचं श्रेय मी आमच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमला देईन. ते पाच-सहा वर्षांपासून खूप मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. त्यांनी प्रत्येकाला या पूर्ण प्रवाहात एकत्र यावं असं काम केलं आहे. मुलींची वेगळी रेस्क्यू टीम तयार केली. त्यानंतर आपण तृतीयपंथींची टीम तयार केली आहे", अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.