महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन कधी? अखेर तारीख जाहीर; राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
यंदा उन्हाचा तडाखा अधिक तीव्र जाणवत असल्याने नागरिक आतुरतेने मेघगर्जना आणि थंडगार सरींची वाट पाहत आहेत.
मान्सून २६ मे रोजी केरळ किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता
दरम्यान, हवामान विभागाकडून मान्सूनबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, नैऋत्य मान्सून २६ मे रोजी केरळ किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता आहे. साधारणपणे १ जूनच्या आसपास केरळमध्ये मान्सून पोहोचतो, मात्र यंदा तो काही दिवस आधीच दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातही मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात
केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर पुढील काही दिवसांत तो वेगाने पुढे सरकत कोकण, गोवा आणि महाराष्ट्राच्या दिशेने प्रगती करतो. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातही मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला यलो अलर्ट
हवामान विभागाने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही दिवसांत विजांच्या कडकडाटासह पाऊस, जोरदार वारे आणि काही ठिकाणी मेघगर्जनेसह सरी कोसळण्याचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यांत वातावरणात बदल जाणवू शकतो.
उष्णतेमुळे तयार झालेल्या कमी दाबाच्या परिस्थितीमुळे राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरण निर्माण होत असून, काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरीही पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
शेतकरी आणि नागरिकांचे मान्सूनकडे लक्ष
मान्सूनच्या आगमनाकडे शेतकऱ्यांचेही लक्ष लागले आहे. खरीप हंगामाच्या तयारीसाठी पावसाचे वेळेवर आगमन महत्त्वाचे मानले जाते. वेळेत आणि समाधानकारक पाऊस झाल्यास शेतीच्या कामांना गती मिळणार आहे.
दरम्यान, वाढत्या उष्म्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडताना काळजी घ्यावी, पुरेसे पाणी प्यावे आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.