...तर महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल ७०-८० रूपयांना मिळू शकतं; जयंत पाटील यांचं फडणवीस यांना पत्र
जयंत पाटील यांनी पत्रात म्हटलंय की, आखाती देशातील युद्धामुळे महाराष्ट्रासह देशाच्या आर्थिक परिस्थितीवर प्रचंड ताण येत आहे. महागाई प्रचंड वाढली आहे. खाद्य तेल, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठी वाढ झाली आहे. याचा फटका थेट सामान्य माणसाला बसत आहे. त्यात भरीस भर पेट्रोल डिझेलचे वाढणारे दर घालत आहेत. केंद्र सरकारकडून वारंवार पेट्रोल व डिझेलचे दर वाढवले जात आहे. आज पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा वाढले आहेत. पेट्रोल २ रुपये ६१ पैशांनी तर डिझेल २ रुपये ७१ पैशांनी वाढले आहे. मागील १० दिवसांत सलग चौथ्यांदा ही वाढ केली जात आहे. आज घडीला मुंबईत १११.१२ रू. प्रति लिटर पेट्रोल मिळत आहे तर डिझेल ९६.८६ रु. प्रति लिटर मिळत आहे. त्यामुळे या महागाईमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. या संकटसमयी आपण पुढाकार घेऊन नागरिकांना दिलासा दिला पाहिजे असं त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली.
पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट-सरचार्ज तात्काळ रद्द करावा
तसेच राज्य सरकार इंधनावर व्हॅट आणि सरचार्ज आकारते जे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लागू आहे. राज्यात पेट्रोलवर अंदाजे २५% व्हॅट + ₹१०.१२ प्रति लिटर सरचार्ज लावला जातो तर डिझेलवर अंदाजे २४% व्हॅट + ₹३.०० प्रति लिटर सरचार्ज लावला जातो. राज्य शासनाने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट व सरचार्ज रद्द करून टाकावा. यामुळे आज १११ रुपयांना मिळणारे पेट्रोल व डिझेल थेट ७०-८० रुपयात मिळू शकते असे झाल्यास या कठीण काळात नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो अशी मागणी माजी मंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.