पुणे शहरात उद्यापासून जमावबंदी? पुढील १४ दिवस मोर्चे, आंदोलने आणि सभांवर कडक निर्बंध
पुणे: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांविरोधात शहरातील विविध राजकीय आणि सामाजिक संघटना आक्रमक झाल्या असतानाच, प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. पुणे शहरात उद्या म्हणजेच २६ मे २०२६ (मंगळवार) रात्रीपासून पुढील १४ दिवसांसाठी 'जमावबंदीचे आदेश' लागू करण्यात आले आहेत. या काळात शहरात कोणत्याही प्रकारचे मोर्चे, आंदोलने, मिरवणुका आणि सभा घेण्यास पोलिसांनी पूर्णपणे बंदी घातली आहे.
सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी पुणे पोलीस प्रशासनाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३७ (१) (२) (३) अन्वये हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. आगामी बकरी ईद तसेच इतर सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मोर्चे आणि सभांना बंदी: पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र येणे, सार्वजनिक ठिकाणी सभा घेणे, मोर्चे किंवा मिरवणुका काढणे यावर पूर्णपणे बंदी असेल.
शस्त्रे आणि घातक वस्तू बाळगण्यास मनाई: तलवार, भाला, लाठी, काठी, बंदूक किंवा शारीरिक इजा करू शकेल अशी कोणतीही वस्तू सार्वजनिक ठिकाणी सोबत बाळगण्यास बंदी असेल.
ज्वलनशील पदार्थांवर बंदी: दगड गोळा करणे, क्षेपणास्त्रे किंवा अस्त्रे तयार करणे, तसेच कोणतेही दाहक, स्फोटक आणि ज्वलनशील द्रव पदार्थ सोबत नेण्यावर निर्बंध असतील.
आक्षेपार्ह घोषणा आणि प्रतिमा दहन: सार्वजनिक शांतता भंग करू शकतील अशा अर्वाच्च घोषणा देणे, चिथावणीखोर गाणी किंवा वाद्ये वाजवणे यावर बंदी असेल. तसेच कोणत्याही नेत्याच्या किंवा व्यक्तीच्या चित्राचे/प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यास मनाई आहे.
आक्षेपार्ह फलक: शिष्टाचाराच्या विरोधात असणारे चित्रे, चिन्हे, फलक वापरण्यावर कडक कारवाई केली जाईल.
कारवाईचा इशारा: जर एखाद्या व्यक्तीने या आदेशाचे उल्लंघन करून शस्त्र किंवा धोकादायक वस्तू बाळगल्या, तर पोलीस त्या वस्तू जप्त करतील आणि संबंधित व्यक्तीवर तात्काळ कायदेशीर गुन्हा दाखल केला जाईल.