पुण्यात 'वंदे भारत'च्या अपघातानंतर रेल्वेने देशातील रुळांबाबत घेतला मोठा निर्णय; 'डबल डायमंड क्रॉसिंग' हटवणार..

पुण्यात 'वंदे भारत'च्या अपघातानंतर रेल्वेने देशातील रुळांबाबत घेतला मोठा निर्णय; 'डबल डायमंड क्रॉसिंग' हटवणार..

 

पुणे : मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसचा पुणे स्थानकाच्या यार्डात चाक घसरून झालेला अपघात रेल्वे बोडनि गंभीरपणे घेतला आहे. असा अपघात पुन्हा होऊ नये यासाठी पुण्यासह देशभरातील 'डबल डायमंड क्रॉसिंग' हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

२७ एप्रिल रोजी मुंबई-सोलापूर एक्स्प्रेस पुणे स्थानकात दाखल होण्यापूर्वी यार्डात अपघातग्रस्त झाली होती. हा देशातील 'वंदे भारत' एक्स्प्रेसचा पहिलाच अपघात ठरला. प्रवासी सुरक्षेचा तातडीचा उपाय म्हणून रेल्वेने आता हे जुने क्रॉसिंग बदलून त्याजागी नवीन अत्याधुनिक आरेखनाचे क्रॉसिंग टाकण्याचे काम हाती घेतले आहे.

पुणे स्थानकाच्या दोन्ही यार्डामधील सुमारे ११ जुने क्रॉसिंग हटविले जाणार असून, त्यापैकी चार नवीन आरेखन असलेले क्रॉसिंग पुण्यात दाखल झाले आहेत. लवकरच या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.

रचना : रुळांच्या जाळ्यात जिथे दोन मार्गिका एकमेकांना तिरप्या रेषेत छेदतात, तिथे हिऱ्यासारखा (डायमंड) आकार तयार होतो, त्याला 'डायमंड क्रॉसिंग' म्हणतात.

फायदा : पुणे स्थानकासारख्या वर्दळीच्या व जागेची कमतरता असलेल्या यार्डात हे क्रॉसिंग महत्त्वाचे ठरते. मर्यादित जागेत गाड्यांना वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वळवण्यासाठी आणि दिशा बदलण्यासाठी याचा वापर केला जातो.

धोका : यात अनेक पॉइंट्स आणि स्विचेस एकत्र काम करत असल्याने, वेगाचे किंवा देखभालीचे नियमन थोडे जरी चुकले, तरी डबे रुळावरून घसरण्याची शक्यता असते.

'डबल डायमंड क्रॉसिंग' हटविण्याचा निर्णय राष्ट्रीय स्तरावर झाला असून, त्यानुसार कार्यवाही केली जात आहे. रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे.

- हेमंत कुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग, पुणे