गोंदिया येथील सहायक आरटीओ राजेंद्र केसकर निलंबित

गोंदिया येथील सहायक आरटीओ राजेंद्र केसकर निलंबित

 


मुंबई: गोंदिया येथील सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) राजेंद्र सदाशिव केसकर याला महाराष्ट्र शासनाने सेवेतून निलंबित केले आहे.

 भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

गृह विभागाने जारी केलेल्या शासन आदेशानुसार, गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात अप. क्र. ६९७/२०२५ अंतर्गत भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारित २०१८) मधील कलम ७(अ) व १२ अन्वये ५ डिसेंबर २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात राजेंद्र केसकर याला अटकही करण्यात आली होती. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून शासनाने २९ एप्रिल २०२६ पासून त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
निलंबन काळात केसकर याचे मुख्यालय परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबई येथे राहणार असून, पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास मनाई करण्यात आली आहे.

तसेच निलंबन कालावधीत त्याला नियमानुसार निर्वाह भत्ता व महागाई भत्ता देण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. हा शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असून उपसचिव चेतन निकम यांनी डिजिटल स्वाक्षरीद्वारे आदेश जारी केला आहे.