पुण्यात जमावबंदीच्या चर्चेने खळबळ! लॉकडाऊन संदर्भातील अफवांवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले स्पष्टीकरण
अमितेश कुमार म्हणाले, “सार्वजनिक सण-उत्सवांच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून दरवर्षी प्रतिबंधात्मक आदेश काढले जातात. या आठवड्यात विविध सण-उत्सव असल्यामुळे जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. याचा लॉकडाऊन अथवा इतर कोणत्याही निर्बंधांशी काहीही संबंध नाही.”
याशिवाय शहरातील काही हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांना रात्री दहा वाजता बंद करण्याच्या सूचनांमुळेही नागरिकांमध्ये वेगवेगळे तर्क-वितर्क सुरू झाले होते. यावर देखील पोलीस आयुक्तांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व प्रकारच्या हॉकर्सना रात्री दहा वाजेपर्यंत वेळ देण्यात आलेली आहे. त्यामुळे फूड स्टॉल्स, खाऊ गल्लीतील स्टॉल्स, हातगाड्या आणि इतर व्यावसायिकांना रात्री दहा वाजता व्यवसाय बंद करावा लागणार आहे. यासोबतच पान टपऱ्यांनाही रात्री दहा वाजताच बंद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच जे हॉटेल्स रस्त्यावर किंवा फुटपाथवर टेबल-खुर्च्या लावून ग्राहकांना जेवण देतात, त्यांनाही रात्री दहा वाजेपर्यंतच परवानगी असेल.
मात्र, स्थायी आणि अधिकृत आस्थापनांना त्यांच्या नियमानुसार निश्चित वेळेत व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी असेल. अशा हॉटेल्स किंवा आस्थापनांच्या कामकाजात पोलिसांचा कोणताही हस्तक्षेप राहणार नसल्याचेही अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले. सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पुणे पोलिसांनी नागरिकांना केले आहे. शहरात कोणताही लॉकडाऊन लागू होत नसून, केवळ सण-उत्सव काळात सुरक्षितता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी हे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.