बँकॉक-दुबई प्रवाशांना थर्मल स्क्रीनिंग बंधनकारक; इबोलामुळे पुणे विमानतळावर हाय अलर्ट जारी

बँकॉक-दुबई प्रवाशांना थर्मल स्क्रीनिंग बंधनकारक; इबोलामुळे पुणे विमानतळावर हाय अलर्ट जारी

 


पुणे : जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) ‘इबोला’ विषाणू संसर्गास ‘आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी’ घोषित केल्यानंतर पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सूचनेनुसार, विमानतळ आरोग्य संस्था आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण यांनी पुणे विमानतळावर कडक तपासणी व पूर्वतयारी उपाययोजना लागू केल्या आहेत. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सध्या एकही संशयित किंवा बाधित रुग्ण आढळलेला नाही. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज केली आहे.

बँकॉक आणि दुबई या दोन शहरांत इबोला विषाणू मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे या दोन्ही देशांतून येणाऱ्या प्रवाशांची पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर थर्मल स्क्रीनिंग अनिवार्य करण्यात आली आहे. सर्व प्रवाशांना उतरण्यापूर्वी विमानातच ‘सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म’ (स्वयं-घोषणापत्र) भरावा लागेल. यामध्ये त्यांच्या प्रवासाची आणि आरोग्याची माहिती देणे आवश्यक आहे. स्क्रीनिंगदरम्यान संशयित आढळणाऱ्या किंवा लक्षणे असणाऱ्या रुग्णांना उपचारासाठी नायडू रुग्णालयातील विशेष कक्षात दाखल केले जाणार आहे. विमानतळ आरोग्य अधिकारी, विमानतळ प्राधिकरणाकडून इमिग्रेशन, कस्टम्स आणि एअरलाईन ऑपरेटरच्या सर्व कर्मचाऱ्यांना पीपीई किट वापरणे, तपासणी करणे आणि संशयित रुग्णांना हाताळण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले.

इबोलामुळे खबरदारीचा उपाय

इबोला व्हायरस झाल्यास ताप, अशक्तपणा, उलट्या किंवा रक्तस्राव यांसारखी कोणतीही लक्षणे आढळल्यास बाधित क्षेत्रातील प्रवासाचा इतिहास असल्यास प्रवाशांनी तत्काळ विमानतळावरील आरोग्य अधिकाऱ्यांना माहिती देणे बंधनकारक आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे, तर विमानतळ प्रशासनाने प्रवाशांना थर्मल स्क्रीनिंग आणि तपासणी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.