पिंपरी चिंचवड विषारी दारू प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे कडक कारवाईचे आदेश
पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या ४८ तासांमध्ये १२ जणांचा मृत्यू झाला. १२ जणांचा मृत्यू विषारी दारूमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणावर मुंबईत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "माझे पोलीस आयुक्तांशी बोलणे झाले आहे. कोणत्या ठिकाणी हे तयार झाले, हे देखील त्यांनी शोधून काढले आहे. या प्रकरणातील संशयितांना अटक करण्यात आली आहे."
आठ जणांना अटक, साखळी शोधण्याचे काम सुरू
"अजून काही जणांचा यात समावेश असू शकतो. त्यांचाही शोध घेण्याचे काम सुरू आहे. गंभीर असलेल्यांना योग्य उपचार देऊन वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. आठ लोकांना अटक झाली असून, आणखी काही लोकांना यात अटक होऊ शकते", अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
मिथेनॉलसारख्या पदार्थापासूनच दारू निर्मिती
"ज्या ठिकाणी हे झाले आहे, त्यांच्या पाठीमागे कोण त्यांनाही पोलीस शोधत आहेत. सगळी साखळी शोधून आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. कारण ही एक प्रकारे हत्याच आहे. त्यामुळे कडक कलमे त्यांच्यावर लावण्यात आले आहेत", असे आदेश पोलिसांना दिले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
"हे मिथेनाईल सारखाच पदार्थ आहे. त्यापासूनच हे तयार करण्यात आले आहे. मी यावर जास्त बोलणं योग्य नाही. पोलीस तुम्हाला यावर अधिक माहिती देतील", असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
जीवघेणी दारू कशी बनवली, पोलिसांनी काय सांगितले?
उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही गावठी दारू अत्यंत बेकायदेशीरपणे तयार करण्यात आली होती. दारूची नशा आणि तीव्रता वाढवण्यासाठी मुख्य आरोपी योगेश वानखेडे याने यामध्ये तब्बल २१५ लीटर घातक ‘मिथेनॉल’ (केमिकलयुक्त विषारी स्पिरिट) मिसळले.
हे अत्यंत विषारी रसायन मिश्रित करून त्याने ही दारू पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील विविध बेकायदेशीर दारू अड्ड्यांवर (गुत्त्यांवर) विक्रीसाठी पाठवली. ही दारू प्यायल्यानंतर अनेक नागरिकांना तीव्र विषबाधा झाली आणि एकापाठोपाठ एक अशा १२ जणांना प्राण गमवावे लागले.